नाशिक : कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख जगभरात आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. मात्र यंदाच्या वर्षी लाल कांदा आणि उन्हाळ कांदा ही दोन्ही पिके अवकाळी पावसामुळे खराब झाली आहे. त्यात काही शेतकऱ्यांनी कसाबसा कांदा वाचवला मात्र आता तो कांदा साठवला तरी खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. शेतात कांदा असताना त्याला काही प्रमाणात पावसाची पाणी लागले होते आणि त्यामुळे हा कांदा खराब होऊ लागला आहे. खरं तर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा केल्यानंतर तो साठवण करण्यासाठी चाळी निर्माण केल्या आहेत. चाळीत कांदा साठवला तर तो अधिक काळ टिकतो मात्र, यंदाच्या वर्षी मोठा फटका बसू लागला आहे. साठवण करून काही दिवस होत नाही तोच कांदा खराब होत असल्याचे लक्षात येऊ लागले आहे.
यंदाच्या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवण करून त्याचे पैसे होतील की नाही याबाबत शंका आहे. अवकाळी पावसाने कांदा अक्षरशः भिजून शेतातच सडून गेला आहे. काही शेतकऱ्यांनी तो कांदा कसाबसा वाचवला असला तरी तो साठवण करूनही टिकत नसल्याचे समोर आले आहे.
एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे वाढलेला तापमानाचा पारा बघता कांदा चाळीमध्ये टिकत नसल्याचं साठवण करतानाच लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी महत्वाचा असणारा उन्हाळ कांदा खराब होऊ लागला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची पुढील वर्षाची दिवाळी फार चांगली होईल अशी स्थिती सध्या तरी दिसून येत नाहीये. त्यात कांदा साठवण करत असतांना त्या कांद्याला काढल्यानंतर पाणी लागणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचे कारण म्हणजे उन्हाळा कांद्याला पाणी लागल्यास तो खराब होऊ लागतो.
चाळीत कांदा साठवण करत असतांना एकही कांदा खराब जाणार नाही याची काळजी घेतली जाते. मात्र, जर चुकून एक जरी खराब कांदा गेला तर इतर कांदेही खराब होऊ लागतात. हेच संकट सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
त्यामुळे पुढील काळात कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामध्ये दुसरी एक बाब म्हणजे कांद्याचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढतील. मात्र त्यावेळी कांदा शेतकाऱ्यांकडे उपलब्ध नसेल त्यामुळे कांदा इकीकडे शेतकऱ्यांना रडवत आहे तर नंतर ग्राहकांना रडवणार आहे.