कोरोनानंतर भारताच्या अर्थ व्यवस्थेवर खोलवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. देशात बेरोजगारीच्या संख्येत देखील वाढ होत असून आता अनेकांना आपली नोकरी जाण्याची भीती आहे. मनी 9 च्या पर्सनल सर्व्हेनुसार 24 % लोकांना त्यांची नोकरी जाण्याची भीती असून 56 % लोकांमध्ये हे भीतीचे प्रमाण कमी आहे. म्हणजेच एकूण 80 % लोक हे नोकरी जाण्याच्या भीतीमध्ये वावरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सर्वेक्षणानुसार ज्या 24 % लोकांना नोकरी जाण्याची भीती आहे त्यांच्याकडे पुरेशी म्हणजे 6 महीने पुरेल इतकी बचत आहे. तसेच ज्या 56 % लोकांना नोकरी गेल्यास त्यांच्याकडे 2 ते 3 महीने काढता येतील इतकी बचत असल्याचे समोर आले आहे.
किती कुटुंबं आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ? :
भारतातील बहुतांश कुटुंबं ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. आकडेवारीनुसार केवळ 6 % कुटुंबं आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असून 20 % कमी सुरक्षित आहेत तर 36 % कुटुंबं आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आणि 38 % कुटुंबं संकटात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यासोबतच 7 % भारतीय कुटुंबांच्या मासिक उत्पन्नातून खर्च भागवणेदेखील कठीण जात आहे.
बिहार, ओडिसा, झारखंड, आसाम , प. बंगाल या राज्यातील लोकांचे उत्पन्न सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे. तसेच या सर्वेक्षणानुसार भारतातील 39 % कुटुंबांचे मासिक उत्पन्न हे 15,000 रुपयांपेक्षा देखील कमी असल्याचे समोर आले आहे.