टिटवाळा : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील प्रसिद्ध महागणपतीच्या टिटवाळ्यातील (Titwala) एका चोरीच्या घटनेमागील धक्कादायक सत्य उजेडात आले आहे. एका शिक्षिकेच्या घरात 69 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची तिच्याच ओळखीच्या इस्त्रीवाल्याने चोरी (Gold Jewellery Theft) केल्याचे उघडकीस आले आहे. विनोद कनोजिया असे चोरट्याचे नाव असून तो परिसरात इस्त्रीचे दुकान चालवतो. तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कल्याण न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
टिटवाळ्यातील डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या मागे असलेल्या श्री सिद्धीविनायक टॉवरमध्ये असलेल्या एका फ्लॅटमध्ये एका खासगी शाळेत नोकरी करणारी शिक्षिका राहते. तिला भाड्याने फ्लॅट घेऊन देणाऱ्या विनोद कनोजिया याचे श्री सिद्धीविनायक पॉवर लॉंड्री नावाचे दुकान आहे.
या शिक्षिकेला फ्लॅट भाड्याने घेऊन दिल्यामुळे त्यांची चांगलीच ओळख झाली होती. त्याचाच गैरफायदा लॉंड्रीवाला विनोद कनोजिया याने घेतला. पती रात्रपाळीमुळे घरी नसताना ही शिक्षिका दरवाजा लोटून शाळेत गेली.
विनोद कनोजिया याने घेऊन दरवाजा उघडा असल्याचे पाहून, तसेच घरात कुणीच नसल्याचा डाव साधत त्याने त्या महिला शिक्षिकेच्या घरातील कपाट उचकटले. त्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, 5 ग्रॅम वजनाचा मांग टिक्का, 5 ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, 7 ग्रॅम वजनाच्या 3 अंगठ्या व ओम नावाचे पान असे एकूण 69 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन त्याने पळ काढला.
मात्र तालुका पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनोद कनोजिया याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने कबुली दिली नाही. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर आरोपी विनोद कनोजिया याला पोलिसांनी अटक करत कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंगटे करत आहेत.