मुंबई : पेट्रोलपंपाचा परवाना काढून देतो, असं सांगून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात संबंधित प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करत बिहारमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. मुंबई सायबर विभागाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कारवाई करण्यात आली (Mumbai cyber police busted big racket of cyber crime) .
संबंधित गुन्ह्यात फसवणूक झालेले पीडित फिर्यादी हे मुंबईच्या मालाड येथे वास्तव्यास आहेत. त्यांना मार्च ते मे 2021 या काळात रोहित गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने इंटरनेटवर पेट्रोलपंपाचं लायसन्स काढून देतो असं सांगितलं. आरोपीने http://petrolpumpsdistributor.in/login/ या वेबसाईटवर फिर्यादींना युजर आयडी आणि पासवर्ड बनवून दिला. तसेच एचपीसीएल कंपनीचा नव्या पेट्रोलपंपचे लायसन्स काढून देतो असं सांगत वेगवेगळ्या कारणे देऊन जवळपास 45 लाख 37 हजार 999 रुपये घेतले. संबंधित प्रकार मार्च ते मे या तीन महिन्यात घडला. मात्र, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव फिर्यांदींना झाली. त्यानुसार त्यांनी पोलिसात तक्रार दिली (Mumbai cyber police busted big racket of cyber crime) .
पोलिसांनी तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईस सुरुवात केली. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी कनावजे, सपोनी अनुराधा पाटील, पोउनी शेवाळे, पोना सावंत गायकवाड, पोना आयरे, पावस्कर, शिंदे, मपोना दळवी, पोशी शिराळकर, पोशी सूर्यवंशी, मपोशी मस्तूद, पोशी मेघे यांनी कारवाई केली. या पथकाने सर्वात आधी लॉगिन केलेल्या वेबसाईटची माहिती घेतली. संबंधित प्रकार हा बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातून घडल्याची माहिती सायबर पोलिसांच्या लक्षात आलं.
सायबर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन एक पथक बिहारला पाठवलं. या पथकाचं नेतृत्व पोउनी शेवाळे यांनी केलं. संबंधित पथक 5 जूनला बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यात दाखल झालं. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात या पथकाने मुख्य आरोपीला गाठलं. या आरोपीचं खरं नाव गौरवराज असं होतं. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. तसेच तो एका कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. तो पोलिसांना संबंधित कॉल सेंटरमध्ये घेऊन गेला. यावेळी पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले.
1. वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 07 मोबाईल
2. एकूण 5 सिम कार्ड
3. सिम कार्डचे रिकामे 07 कव्हर
4. विविध बँकेचे 06 चेक बुक
5. एकूण 3 बँक पासबुक
6. एचडीएफसी बँकेचे 02 चेक
7. बँक ऑफ बडोदाचे वेलकम किट
8. 11 एटीएम कार्ड
9. एकूण 03 लाख 8 हजार 200 रुपयांची रोख रक्कम