‘मी सुशिक्षित आहे, माझे निर्णय स्वतः घेऊ शकते’, मुलीचे बोलणे ऐकून बाप संतापला अन्…
मुलीला प्रेमविवाह करायचा होता. पण पित्याला समाजात बदनामीची भीती होती. पित्याने मुलीला समजावून तिचा हट्ट सोडण्यास सांगितले. मात्र मुलगी काही ऐकायला तयार नव्हती. यातून नको ते घडले.
कासगंज : प्रेमविवाहावरुन बापलेकिमध्ये वाद सुरु होता. पित्याचा मुलीच्या प्रेमाला विरोध होता, मात्र मुलगी आवडत्या मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट करत होती. या कारणातून बाप-लेकीचा वाद टोकाला गेला. संतापलेल्या पित्याने लायसन्सधारी बंदुकी मुलीवर रोखली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. उत्तर प्रदेशातील जनपद कासगंजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला संपवल्यानंतर बापाने स्वतःचेही जीवन संपवले. पीडित मुलगी सुशिक्षित असून एका शाळेत शिक्षिका होती, तर पिता कॉलेजमध्ये फिजिक्स विषयाचे प्रोफेसर होते.
मुलीचा प्रेमविवाह वडिलांना मान्य नव्हता
मैनपुरी जिल्ह्यात राहणारे नरेंद्र सिंह यादव कासगंज स्थित एका कॉलेजमध्ये फिजिक्सचे प्रोफेसर म्हणून काम करत होते. तर मुलगी मिर्झापूर प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका होती. मुलीला आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचे होते. मात्र वडिलांना हे मान्य नव्हते. पित्याने मुलीला खूप समजावले, मात्र ती ऐकायला तयार नव्हती. मुलीने स्पष्ट शब्दात वडिलांना सांगितले की, ‘मी सुशिक्षित आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, माझे निर्णय स्वतः घेऊ शकते’, हे ऐकताच वडिल संतापले.
जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात नेले मात्र…
संतापात्या भरात वडिल रुममध्ये गेले आणि आपली परवानाधारक बंदुक घेऊन आले. यानंतर बंदुक मुलीवर रोखली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं. यानंतर स्वतःही जीवन संपवले. पती आणि मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून पत्नीने आरडाओरडा सुरु केला. महिलेचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी तात्काळ दोघांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. बदनामीच्या भीतीने पित्याने जे केले त्यानंतर संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त झाले.