चोरट्यांचा पेट्रोलपंपावरील तिजोरीवर डल्ला, मास्कधारी चोरटे सीसीटीव्हीत कैद
चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत आहेत. वाढत्या चोरीच्या घटना रोखणे पोलिसांसमोर आव्हान आहे. विमको नाक्यावर असलेला भारत पेट्रोल पंप बंद करुन रात्री मॅनेजर घरी गेले. सकाळी येऊन पाहतात तर त्यांना धक्काच बसला.
अंबरनाथ / निनाद करमरकर : अंबरनाथमध्ये पेट्रोल पंपाच्या ऑफिसमधून रोकड चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या विमको नाक्यावरील भारत पेट्रोलियम पंपावर रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. कार्यालयातून सुमारे पावणे तीन लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
चोरट्यांनी 2 लाख 86 हजाराची रोकड लांबवली
विमको नाक्याचा पेट्रोल पंप रात्री 10 वाजता बंद होतो. रविवारी पेट्रोल पंप बंद केल्यानंतर येथील मॅनेजर पवन शर्मा यांनी हिशोब केला. जमलेली 2 लाख 86 हजारांची रोकड ड्रॉवरमध्ये ठेवत कार्यालय बंद करून निघून गेले. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास 5 चोरटे पेट्रोल पंपावर आले. त्यापैकी दोघांनी पेट्रोल पंपाच्या कार्यालयाचा कडी कोयंडा तोडत आतमध्ये प्रवेश केला.
चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
ड्रॉव्हरमधील 2 लाख 86 हजारांची रोकड चोरून पोबारा केला. ही चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. आपली ओळख लपवण्यासाठी चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. या प्रकारानंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली.
विमको नाक्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी पेट्रोल पंपावर झालेल्या या चोरीमुळे परिसरातील दुकानदार आणि व्यावसायिक धास्तावले आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्यासोबतच चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी होत आहे.