AI सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. जौनपूर फॅमिली कोर्टातील काही कागदपत्र समोर आली आहेत. निकिता विरुद्ध अतुल प्रकरणाची ही कागदपत्र आहेत. न्यायाधीश रीता कौशिक यांच्याकडे हे प्रकरण आहे. निकिताने अतुलवर हुंड्यासाठी छळ केल्याचा, मारहाणीचा आणि दुसऱ्या मुलींसोबत अफेअरचा आरोप केला होता. त्यावर अतुलने स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर त्याने निकितावर एका मुलासोबत तिचं अफेअर सुरु असल्याचा आरोप केला होता. त्या मुलाच्या विषयावरुन दोघांमध्ये भांडणं सुद्धा झाली. त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला.
“लग्नानंतर अतुलचे कुटुंबीय माझ्याकडे 10 लाख रुपये हुंड्याची मागणी करत होते. आम्ही लग्नात 35 लाख रुपये खर्च केले. 5 लाख कॅश अतुलच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर ते माझ्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करत होते. माझ्या आई-वडिलांना अपमानित केलं. त्यामुळे माझ्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. अतुलने बंगळुरुमध्ये असताना अनेकदा मला मारहाण केली. त्याचं हिना ऊर्फ रिंकीसह तीन मुलींसोबत अफेअर सुरु होतं. तो सगळे पैसे अय्याशीत उडवायचा, म्हणून मी जौनपूरला निघून आली” असं आरोप निकिताने केला.
त्याच्यासोबत तासनतास बोलायची
यावर अतुलने म्हटलं की, “आमच्यात सगळं काही ठीक होतं. पण निकिता कधी माझं ऐकायची नाही. मी शाकाहारी आहे, ती मांसाहारी. मांस खाऊन ती हाडाचे तुकडे खोलीत फेकायची. म्हणून मी तिला रोखायचो. पण ती सुधारली नाही. निकिताच रोहित निगम नावाच्या मुलासोबत अफेअर सुरु असल्याचा मला संशय आहे. त्यावरुन आमच्यात अनेकदा भांडणं सुद्धा झाली. मात्र, तरीही ती त्याच्या बरोबर तासनतास बोलत रहायची”
रिंकी माझ्या मित्राची पत्नी
हिना ऊर्फ रिंकीबद्दल स्पष्टीकरण देताना अतुल म्हणाला की, “निकिताने माझ्यावर चुकीचा आरोप केलेला. रिंकी माझ्या मित्राची पत्नी होती. माझी गर्लफ्रेंड नव्हती. मी दोघांची निकिताबरोबर भेट सुद्धा घडवून दिली होती. पण तिला नेहमी असं वाटायचं की रिंकी माझी गर्लफ्रेंड आहे. ती जेव्हा घर सोडून गेली, तेव्हा मला हे माहित नव्हतं की, ती कायमसाठी चालली आहे. कारण परत येईन असं सांगून ती गेली होती. मी नेहमी तिला पैसे पाठवायचो. निकिताच्या आईने माझ्याकडून पैसे घेतले होते, तेच त्यांनी परत केले”