घरजावई होण्यास नकार दिल्यामुळे पूर्ण कुटुंबावर बहिष्कार, जात पंचायतीच्या 6 जणांना अटक
जात पंचायतीच्या माध्यमातून कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केल्याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
पुणे : जात पंचायतीच्या माध्यमातून कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केल्याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडला असून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. इचलकरंजी येथील सुशांत नगरक यांनी हा गुन्हा दाखल केला होता. (Pimpri Chinchwad Six people have been arrested for expelling family from community through caste panchayat)
सासरच्या मंडळीकडून घरजावई होण्यासाठी गळ
मिळालेल्या माहितीनुसार सुशांत नगरक यांचे 21-11-2019 रोजी कंजारभट समाजातील मुलीशी हिंदू पद्धतीने लग्न झाले होते. त्यानंतर सुशांत यांनी त्यांची पत्नी गरोदर राहिल्यानंतर तिला माहेरी पाठवले. मार्च महिन्यात सुशांत यांच्या सासरच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पत्निला पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील घरी आणले. त्यानंतर वारंवार विनंती करुनही सुशांत यांच्या पत्नीला त्यांच्या सासरचे लोक परत पाठवत नव्हते. याच गोष्टीमुळे शेवटी सुशांत यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींकडे विचारणा केली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी सुशांत यांना घरजावई होण्याची गळ घातली.
आधी साडे पाच हजार रुपये भरण्याचे फर्माण
सुशांतने घऱजावई होण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे बोलवण्यात आले. मोशीमध्ये जात पंचायत भरवण्यात आली. या जात पंचायतीत सुशांत यांना साडे पाच हजार रुपये दंड म्हणून भरण्यास सांगितले. सुशांत यांनी ही रक्कम भरण्यास नकार दिला.
नंतर जातपंचायतीकडून 15 लाखांचा दंड
नंतर सुशांत यांच्या नातेवाईकांनी साडे पाच हजारांचा हा दंड भरलासुद्धा. मात्र, जात पंचायतीने सुशांत आणि त्यांच्या नातेवाईकांना आणखी 15 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. हा दंड सुशांत यांनी भरण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकण्याचा आदेश जात पंचायतीने दिला. विशेष म्हणजे जात पंचायतीचा अध्यक्ष हा सुशांत यांच्या पत्नीचा चुलता आहे.
पोलिसांनी केले सहा जणांना अटक
दरम्यान या निर्णयानंतर भोसरी एमआयडीसीमध्ये जात पंचायतीविरोधात आणि सुशांत यांच्या सासरच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केलीय. अटक केलेल्यांमध्ये विजय गागडे, भुपेंद्र तामचिकर, परमानंद अभंगे, सुभाष माचरे यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या :
अगरवूड तेलाची बेकायदा विक्री करणारा कारखाना उद्ध्वस्त; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
Raj Kundra arrest : राज कुंद्रांचा ‘डर्टी पिक्चर’ कसा उघडा पाडला? मुंबई पोलिसांनी A टू Z सांगितलं
बाभळीवर खिळे ठोकले, लिंबू,काळ्या बाहुल्या लटकवल्या; नाशिकमध्ये जादूटोण्याच्या प्रकारामुळे घबराट
(Pimpri Chinchwad Six people have been arrested for expelling family from community through caste panchayat)