पुणे : हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या मटण सूपमध्ये भात आढळल्याने संतापलेल्या दोन तरुणांनी वेटरची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. या घटनेत हॉटेलमधील अन्य दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपींविरेधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींपैकी एकाची ओळख पटली असून, विजय वाघिरे असे त्याचे नाव आहे. तर दुसऱ्या आरोपीची ओळख अद्याप पटली नाही. मंगेश पोस्ते असे हत्या करण्यात आलेल्या 19 वर्षीय वेटरचे नाव आहे. तर अजित मुटकुळे आणि सचिन भवर अशी जखमींची नावं आहेत.
विजय वाघिरे हा आपल्या मित्रासोबत पिंपळ सौदागर परिसरातील सासुरवाडी हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यावेळी दोघेही आरोपी दारुच्या नशेत होते. दोघांनी मटण सूप ऑर्डर केले. मटण सूप आल्यानंतर त्यामध्ये भात आढळला.
मटण सूपमध्ये तांदूळ आढळल्यानंतर दोघेही आरोपी चिडले आणि हॉटेल कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. विजय वाघेरे आणि त्याच्या साथीदाराने या हॉटेलमधील तीन कर्मचाऱ्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी वेटर मंगेश पोस्टेच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
ही घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली आहे. त्याच आधारे सांगवी पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.