अभिनेता सलमान खानचा भावोजी अर्थात बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्माला अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. सलमाननेच आयुषला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीपासूनच त्याला घराणेशाहीच्या टीकेचा सामना करावा लागतोय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुष याविषयी व्यक्त झाला. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आयुषला खान कुटुंबात लग्न केल्यापासून लोकांच्या विविध मतांना सामोरं जावं लागतंय. आयुष हा भाजप नेते अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. आयुषचे आजोबा दिग्गज काँग्रेस नेते पंडित सुखराम आहेत. आयुषने फक्त आर्थिक फायद्यासाठी आणि बॉलिवूडमध्ये सहज एण्ट्री मिळवण्यासाठी अर्पिताशी लग्न केल्याचं म्हटलं गेलं.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत आयुष म्हणाला, “सोशल मीडियानेच माझ्याबद्दलच्या अनेक गोष्टी ठरवल्या आहेत. माझ्या लग्नाच्या वेळी अशी चर्चा होती की मला हिरेजडीत शेरवानी भेट म्हणून मिळाली. मला आजपर्यंत तशी शेरवानी मिळाली नाही. मला हुंडा म्हणून बेंटली कार मिळाल्याचीही चर्चा होती. कुठे आहे ती बेंटली? मला या सगळ्या गोष्टींची गरजही नाही.”
“मी दिल्लीचा बिझनेसमन असल्याचं मीडियानेच ठरवलं होतं. मी कोणत्याच अँगलने बिझनेसमन वाटत नाही. माझी राजकीय पार्श्वभूमी आहे. माझे वडील राजकारणी आहेत आणि मी स्ट्रगलिंग अभिनेता आहे. मग मी बिझनेसमन कसा झालो हेच मला कळत नाही. लोकांनी माझ्या लग्नावरून कमेंट्स केल्या की मी पैसे, करिअर आणि बॉलिवूडमध्ये एण्ट्री मिळवण्यासाठी लग्न केलं. मी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या चांगल्या कुटुंबाचा आहे. मला माझ्या आईवडिलांनी बरंच काही दिलंय. मला पैशांची कधीच भूक नव्हती”, अशा शब्दांत त्याने ट्रोलिंगवर उत्तर दिलं.
बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तब्बल 300 ऑडिशन्स दिल्याचाही खुलासा त्याने या मुलाखतीत केलं. इतकंच नव्हे तर स्ट्रगलिंग अभिनेता असतानाच अर्पिताशी ओळख झाल्याचं त्याने सांगितलं. “बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याआधी मी 300 ऑडिशन्स दिल्या होत्या. ज्यावेळी माझी अर्पिताशी मैत्री झाली तेव्हासुद्धा मी स्ट्रगलिंग अभिनेताच होतो. लग्नाआधी अर्पिताला माझ्या चरित्राविषयी समजलं नसेल का? ती इतकी भोळी आहे का? संपूर्ण खान कुटुंबाला माझ्याविषयी माहिती नसेल का? त्यामुळे ही सर्व तथ्यहीन चर्चा आहे. एक गोष्ट अनेकांना माहीत नाही की ज्यावेळी माझं अर्पिताशी लग्न ठरलं, तेव्हा मी सलमान सरांना सांगितलं होतं की मला अभिनय करायचा नाही. कारण मी आतापर्यंत 300 ऑडिशन्स दिले आहेत आणि तरी काहीच झालं नाही. त्यामुळे मी अजून प्रयत्न करू शकत नाही. तेव्हा सलमान सरांनी मला प्रशिक्षण देण्याचं ठरवलं होतं”, असं आयुष पुढे म्हणाला.