अभिनेते बापलेकांमधील वाद चव्हाट्यावर; मोहन बाबू यांची मुलाविरोधात थेट पोलिसांत तक्रार
मोहन बाबू यांचं कुटुंब अशा पद्धतीने वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी मंचू मनोजने त्याचा सावत्र भाऊ विष्णू मंचूवर कुटुंबीयांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. मनोजने भूमा मोनिका रेड्डी हिच्याशी पुनर्विवाह केल्यानंतर कौटुंबिक वाद वाढल्याची चर्चा आहे.
दिग्गज तेलुगू अभिनेते मोहन बाबू आणि त्यांचा मुलगा मंचू मनोज यांच्यातील कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मोहन बाबू यांनी त्यांचा मुलगा मंचू मनोज आणि सून मोनिक यांच्याविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दोघांनीही मला धमकी दिली असल्याचा आरोप त्यांनी केला असून पोलिसांकडे सुरक्षेची मागणीदेखील केली आहे. मनोज मंचू आणि त्याच्याच काही लोकांनी रविवारी रंगारेड्डी जिल्ह्यातील जलपल्ली इथल्या मोहन बाबू यांच्या घरी जाऊन गोंधळ घातला, अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
“मला माझ्या सुरक्षेची भीती वाटतेय. माझ्या मौल्यवान गोष्टी आणि संपत्ती सुरक्षित नाहीत. माझ्यावर हल्ला करण्यासाठी आणि माझ्या मनात भीती निर्माण करण्यासाठी ती लोकं माझ्या घरी दबा धरून बसली होती, अशी माहिती मला मिळाली होती. यामुळे मला माझंच हक्काचं घर सोडावं लागतंय. ती सर्व लोकं समाजकंटकं असून माझ्या घरातील लोकांमध्ये ते भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यासह ते त्यांच्याही जिवाला ते धोका निर्माण करत आहेत”, असं मोहन बाबू यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलंय.
मोहन बाबू यांनी स्वत:च्याच मुलाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी सून आणि त्यांच्याशी संबंधित इतरही काही लोकांवर आरोप केला आहे. त्या सर्वांना माझ्या घरापासून दूर करा, अशीही विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे. “माझी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मला पुरेसं संरक्षण द्या, जेणेकरून मी माझ्या घरात कोणत्याही भीतीशिवाय प्रवेश करू शकेन”, असंही ते म्हणाले. मोहन बाबू हे त्यांच्या विद्यापिठासह शैक्षणिक संस्थांची साखळीही चालवतात.
‘8 डिसेंबर रोजी माझा छोटा मुलगा मनोज (जो माझं घर सोडून गेला होता आणि अचानक आता चार महिन्यांनंतर परतला आहे) याने घरात गोंधळ घातला असून त्याच्यासोबत काही माणसंसुद्धा धमक्या द्यायला आली होती. ती माणसं त्यानेच मागवली होती. नंतर तो त्याची पत्नी मोनिकासोबत घरातून निघून गेला आणि त्याला सात महिन्यांच्या मुलीला आमच्याच घरी सोडून दिलं. मी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास माझ्या ऑफिसमध्ये असताना माझ्या एका कामगाराने मला माहिती दिली की मनोजशी संबंधित जवळपास 30 जण माझ्या घरात शिरले आहेत. त्यांनी माझ्या स्टाफलाही धमक्या दिल्या आहेत’, असं मोहन बाबू यांनी तक्रारीत म्हटलंय.
View this post on Instagram
याआधी मनोज मंचूने काही वेळा पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. वडिलांनी माझ्यावर हल्ला केला, असा आरोप त्याने केला आहे. नुकतेच त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये तो एका रुग्णालयातून बाहेर येताना दिसत असून त्याच्या मानेला पट्टी बांधलेली आहे. इतकंच नव्हे तर रुग्णालयातून कारच्या दिशेने जाताना तो अडखळत चालताना दिसला. मनोजच्या मानेला आणि पायाला दुखापत झाल्याची चर्चा होती. यावेळी मनोजने माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
वडील मोहन बाबू यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मनोजसुद्धा हैदराबादमधील एका पोलीस ठाण्यात गेला होता. वडिलांनी त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर त्यांच्या राहत्या घरी हल्ला केल्याचा आरोप त्याने यावेळी केला. तक्रार दाखल करण्यापूर्वी मनोजने पोलिसांना त्याच्या जखमा दाखवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र मोहन बाबू यांनी हे आरोप फेटाळले असून मुलानेच हा हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला आहे. संपत्तीच्या वादामुळे बापलेकामध्ये हे मतभेद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.