कॉमेडियन कपिल शर्माचा नवीन शो ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आतापर्यंत या शोचे तीन एपिसोड प्रसारित झाले असून चौथ्या एपिसोडमध्ये अभिनेता विकी कौशल आणि त्याचा भाऊ सनी कौशल पाहुणे म्हणून येणार आहेत. या शोच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा पुन्हा एकत्र आले आहेत. विमानातून प्रवास करताना कपिलसोबत सुनीलचा वाद झाला आणि त्यानंतर त्याने हा शो सोडल्याचं म्हटलं गेलं होतं. जेव्हा अचानक सुनील ग्रोवरने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांची निराशा झाली होती. आता सुनील कपिलच्या शोमध्ये परतल्यानंतर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. मात्र शोच्या या चौथ्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा कपिल आणि सुनील यांच्यात वाद झाल्याचं पहायला मिळालं.
सुनील मंचावर येऊन जेव्हा कॉमेडी करत होता, तेव्हा कपिल सतत मध्ये मध्ये बोलून त्याला थांबवत होता. अखेर वैतागलेला सुनील असं काही बोलतो, जे ऐकून तिथे उपस्थित असलेला विकी कौशलसुद्धा थक्क झाला होता. सुनील आधी या एपिसोडमध्ये ‘कमलेशची पत्नी’ बनून पोहोचला आणि त्याने विकीसोबत रोमँटिक डान्स केला. सुनीलने विकीसोबत फ्लर्टसुद्धा केलं. त्यानंतर इंजीनिअर चुंबक मित्तल बनून त्याने स्टेजवर धमाल केली. इंजीनिअरिंग क्षेत्रावर त्याचं किती प्रेम आहे आणि त्याला ते काम किती आवडतं, याविषयी तो विकीला सांगत असतो. हे ऐकताच कपिल शर्मा मध्ये बोलतो की, “छोटा काश्मीर नावाची एक जागा आहे, तिथे हा पाच वर्षांपर्यंतच्या माकडांना अंघोळ घालतो.” यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. तेव्हा सुनील म्हणतो, “तुम्ही हसा, पण माझं याच्यासोबत हसण्या-मस्करीचं नातं नाही.”
यानंतर सुनील विकी कौशलसोबत मस्करी करत असतो. तेव्हा कपिल पुन्हा त्याला विचारतो, “हे तू काय करतोय?” त्यावर सुनील म्हणतो, “मी माकडांना अंघोळ घालतो का? हा असं सर्वकाही यासाठी बोलतो कारण समोर ज्या मॅडम आहेत, त्यांनी हसावं. त्यांना वाईट वाटेल, पण हा या लोकांचा धंदा आहे.” हे ऐकताच परीक्षकांच्या खुर्चीवर बसलेली अर्चना पुर्ण सिंह जोरजोरात हसू लागते.