किंचाळ्या आणि हाहा:कार, इस्रायलच्या हल्ल्यात अनेक नागरिक जिंवत जळाले
इस्रायल आणि हमाय यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. हमासने सुरु केलेले युद्ध आम्ही संपवू असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी आधीच म्हटले आहे. त्यामुळे ते सतत हमासच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. पण यामध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांचा जीव गेल्याचा दावा पेलिस्टाईनने केलाय.
हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळेच इस्रायलने संपूर्ण गाझाला उद्धवस्त केले आहे. यानंतर आता इस्रायली सैन्याने रफाहमध्ये मोठ्या ताकदीने हल्ला केला आहे. जगातील सर्व देशांनी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या (आयसीसी) इशारा दिल्यानंतर ही इस्रायलने हा हल्ला केलाय. नेतन्याहू यांच्या सैन्याचे पुढील लक्ष्य रफाह आहे. रविवारी, इस्रायली सैन्याने रफाहच्या निर्वासितांच्या छावण्यांवर हल्ला केला. गाझा आणि वेस्ट बँकमधून जीव मुठीत धरून पळून जाणाऱ्या निर्वासितांवर हा हवाई हल्ला झाला.
अनेक नागरिक ठार
पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत ताल अस-सुलतान, जबलिया, नुसिरत आणि गाझा शहरात इस्रायली हल्ल्यात किमान १६० नागरिक ठार झाले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यानंतर भयानक स्थिती आहे. अनेक ठिकाणी मृतदेह जळत आहेत. काही ठिकाणी आरडाओरडा तर काही ठिकाणी नुसती शांतता होती.
गाझा आणि वेस्ट बँकमधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, 15 दिवसांपूर्वी इस्रायली हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी निर्वासितांच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला होता. त्यावरच इस्रायलने हल्ला केलाय. रात्रीच्या अंधारात झालेल्या या हल्ल्यामुळे अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. अनेकजण शांत झोपले असतानाच हा हल्ला झाला. ज्यानंतर किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. अनेक लोकं झोपेतच जळून खाक झाले. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
इस्रायलचा वेगळाच दावा
गाझा आणि वेस्ट बँक अधिकाऱ्यांच्या दाव्याच्या विरोधात इस्रायली लष्कराने दावा केला आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, आम्ही हमासच्या छावणीवर हल्ला केला आहे. इस्रायलने हमास चीफ ऑफ स्टाफ यासिन राबिया आणि वेस्ट बँक डिव्हिजन कमांडर खालेद नागर यांची हत्या केल्याचा दावा केला आहे. त्यांनी हमासच्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा देखील दावा केला आहे. IDF ने म्हटले की, हमासने या हल्ल्याचे वर्णन नरसंहार म्हणून केले आहे. हमासच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, गाझा नंतर आता रफाहमध्येही इस्रायली सैन्याने निरपराधांची हत्या करून आपले हात घाण केले आहेत. याची किंमत त्याला मोजावी लागेल.
‘इस्रायलने नरसंहार थांबवावा’
इस्त्रायली हल्ल्यांच्या विरोधात अनेक देशांनी आवाज उठवला आहे. काही देशांनी इस्रायला हल्ला थांबवण्याचे आवाहन केले आहे. जगभरातून पुन्हा एकदा युद्धबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक निरपराध लोकांचा जीव गेलाय.