Pakistan PM : पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर आता सरकार स्थापनेचा राजकीय तिढा सुटला आहे. पाकिस्तानातील दोन प्रमुख पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यांच्यात युती झाली आहे. शाहबाज शरीफ हे या पंतप्रधान होणार असल्याचं समोर आले आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पीपीपी आणि पीएमएल-एनच्या प्रमुख नेत्यांनी पुष्टी केली की ते देशाच्या व्यापक हितासाठी सरकार स्थापन करण्यासाठी आघाडीत सामील होत आहेत.
पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी पुष्टी केली की, शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर आसिफ अली झरदारी हे देशाचे राष्ट्रपती होतील. “पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज यांच्याकडे आता बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे ते पुढील सरकार स्थापन करणार आहेत. बिलावल भुट्टो-झरदारी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, देशाला सध्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी दोन्ही पक्ष पुढील सरकार स्थापन करतील. आम्ही मान्य केले आहे की आम्हाला भविष्यातील पिढ्यांसाठी पाकिस्तानचे यश सुनिश्चित करायचे आहे.”
पीपीपीला कोणती मंत्रीपदे मिळतील याबाबत विचारणा केली असता. शाहबाज म्हणाले की बिलावल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने पहिल्या दिवसापासून कोणत्याही मंत्रिपदाची मागणी केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु होती आणि परस्पर संवादातून प्रश्न सोडवले जातात. याचा अर्थ आम्ही त्यांच्या मागण्या मान्य करतो किंवा त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या असा होत नाही. त्यांची स्वतःची मते आहेत.
8 फेब्रुवारी रोजी झालेल्या पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे पंतप्रधान कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होते. आता या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय़ घेतला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत, इम्रान खान यांच्य़ा पीटीआय समर्थित अपक्ष उमेदवारांना सर्वाधिक 92 जागा जिंकल्या होत्या. पीएमएल-एनला 79 तर पीपीपीने 54 जागा जिंकल्या आहेत.
इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घातल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या समर्थनातून अनेक उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.