बंदूक चालवायच्या, पण ई-मेलचा वापर पहिल्यांदाच; महाराणी एलिझाबेथ यांचे हे पाच किस्से माहीत आहेत का?
शाही घराण्यातील सदस्य आणि महाराणींना भेटायला येणाऱ्या लोकांना त्यांच्या डिनरच्या नियमांची पुरेपूर माहिती होती. डिनर करताना महाराणी चमचा आणि चाकू जेव्हा प्लेटमध्ये ठेवायच्या तेव्हा त्यांचं जेवण संपलेलं असायचं.
नवी दिल्ली: ब्रिटनच्या (Britain) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर आता त्यांच्याविषयीचे अनेक अज्ञात किस्से समोर येत आहेत. राजेशाही थाटात आयुष्य जगलेल्या महाराणींचे किस्से अजब गजब आणि थक्क करणारे आहेत. त्यातून महाराणी म्हणून त्यांचं असलेलं व्यक्तिमत्त्वही अधोरेखित होतं. महाराणी एलिझाबेथ या 15 देशाच्या महाराणी होत्या. त्या कोणत्याही देशात व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय (passport) जाऊ शकायच्या. यावरून त्यांच्या पदाची प्रतिष्ठा आणि त्यांची ताकद दिसून येते. त्यांचे असेच काही किस्से जाणून घेऊयात.
म्हणून नो व्हिसा, नो पासपोर्ट
महाराणी एलिझाबेथ द्वितीय या कोणत्याही देशात मुक्तपणे संचार करू शकत होत्या. त्यांना त्यासाठी व्हिसा आणि पासपोर्टची गरज पडत नसायची, हे फार कमी लोकांना माहीत आहे. शाही घराण्यातील व्यक्तीला इतर देशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट बंधनकारक आहे. पण हा नियम महाराणींना लागू नव्हता. महाराणी असल्यामुळेच त्यांना व्हिसा आणि पासपोर्टची सक्ती नसायची. त्याचं कारण म्हणजे ब्रिटनमध्ये पासपोर्ट महाराणींच्या नावाने आणि फोटोसहीत जारी केला जातो. त्यामुळे त्यांना पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज पडत नाही. एवढेच नव्हे तर शाही घराण्याचे अनेक नियम त्या घराण्यालाच नव्हे तर पाहुण्यांनाही पाळावे लागत होते.
पहिल्यांदा ई-मेल केला
ई-मेलचा वापर करणाऱ्या शाही घराण्यातील महाराणी या पहिल्या व्यक्ती होत्या. त्यांनी 1976मध्ये इंग्लंडच्या टेलिकम्युनिकेशन रिसर्च सेंटरचा दौरा केला होता. याच ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा 26 मार्च रोजी पहिल्यांदा ई-मेल केला होता.
ट्रकची चाकेही बदलायच्या
महाराणी ट्रेंड मॅकेनिक होत्या हे फारच कमी लोकांना माहीत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महाराणींनी ट्रकची चाके बदलण्याचं काम शिकून घेतलं. कारचं इंजिन दुरुस्त करण्याचं कामही त्या शिकल्या होत्या. एवढेच नव्हे तर बंदूक चालवण्याचं ट्रेनिंगही त्यांनी घेतलं होतं.
महाराणी जेवल्या म्हणजे…
शाही घराण्यातील सदस्य आणि महाराणींना भेटायला येणाऱ्या लोकांना त्यांच्या डिनरच्या नियमांची पुरेपूर माहिती होती. डिनर करताना महाराणी चमचा आणि चाकू जेव्हा प्लेटमध्ये ठेवायच्या तेव्हा त्यांचं जेवण संपलेलं असायचं. त्याचवेळी इतरांचंही जेवण झाल्याचं गृहित धरल्या जायचं आणि सर्वांना डिनर टेबलवरून उठावं लागायचं. महाराणीचं जेवण संपलं म्हणजे सर्वांचं जेवण संपलं असा हा नियम होता. त्यानंतर कोणीही जेवत नसे.
प्राणी प्रेमी
महाराणींना श्नानांविषयी प्रचंड प्रेम होतं. त्यांच्याकडे एक दोन नव्हे तर 30 कुत्रे होते. त्यांना रॉयल कॉर्गिस म्हणून ओळखलं जायचं. त्यात विविध जातीच्या श्वानांचा समावेश होता.