धक्कायदायक ! पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, 78 लोकांचा मृत्यू; कुठे घडली ही घटना?

| Updated on: Apr 20, 2023 | 7:11 AM

यमनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमावेळी भयंकर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 13 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राजधानी सानामध्ये दहशतीचं वातावरण आहे.

धक्कायदायक ! पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, 78 लोकांचा मृत्यू; कुठे घडली ही घटना?
Stampede
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

साना : यमनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 78 लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर उपचार करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यापाऱ्यांकडून यावेळी नागरिकांना पैशांचं वाटप केलं जात होतं. त्यावेळी नागरिकांनी एकच झुंबड केली होती. प्रचंड गर्दी झाल्याने लोकांना आवरणं कठिण झालं होतं. त्यातच चेंगराचेंगरी झाल्याने 78 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी दोन व्यापाऱ्यांना हुती बंडखोरांनी ताब्यात घेतलं आहे.

हुती बंडखोर संचलित गृहमंत्रालयाने याबाबतची ही माहिती दिली. राजधानी सानाच्या जुन्या शहरात ही घटना घडली. व्यापाऱ्यांनी गरीब लोकांना आर्थिक मदत मिळाली म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. मात्र, या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन करण्यात आलं नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बंडखोरांचे ब्रिगेडियर अब्देल खलीक अल अघरी यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

दरम्यान, या घटनेनंतर ज्या शाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ती शाळा तात्काळ बंद करण्यात आली आहे. पत्रकारांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी गर्दी प्रचंड झाली होती. त्यामुळे जमावाला नियंत्रित करण्यासाठी सशस्त्र हुती बंडखोरांनी हवेत गोळीबार केला होता. गोळी एका विजेच्या तारेला लागली. त्यामुळे स्फोट झाला. या घटनेमुळे लोक घाबरले. त्यांच्यात दहशत निर्माण झाली आणि एकच पळापळ सुरू झाली. त्यामुळे ही घटना घडल्याचं, प्रत्यक्षदर्शी अब्देल रहमान अहमद आणि याहिया मोहसीन यांनी सांगितलं.

बंडखोरांचं नियंत्रण

यमनच्या राजधानीवर बंडखोरांचं नियंत्रण आहे. येथील सरकार हटवून त्यांनी यमनच्या राजधानीवर कब्जा मिळवला आहे. 2014मध्ये बंडखोरांनी यमनवर ताबा मिळवला होता. देशात पुन्हा नवे सरकार स्थापन करण्यासाटी 2015मध्ये सौदीच्या नेतृत्वातील आघाडीला हस्तक्षेप करण्यास प्रोत्साहित करण्यात आलं होतं. गेल्या काही वर्षांपासून सौदी अरब आणि ईरानच्या दरम्यान छुपे युद्ध सुरू आहे. या छुप्या युद्धात आतापर्यंत 150000 लोक मारले गेले आहे. जगातील हे सर्वात मोठं मानवी संकट मानलं जातं.