सर्वात आधी सेल्फी कोणी आणि कधी काढला?, पाहा selfie चा इतिहास
मोबाईल फोन स्मार्ट झाल्यानंतर आपण त्याने बोलण्यापेक्षा त्याद्वारे सेल्फी घेण्याला जास्त महत्व देऊ लागलो आहोत. आता सेल्फीसाठी देखील खास मोबाईल फोन बाजारात आले आहेत. परंतू पहिला सेल्फी कोणी काढला आहे याची माहीती तुम्हाला माहीती आहे का ? तर चला पाहूयात सेल्फीचा इतिहास
मुंबई | 17 मार्च 2024 : आजकाल सेल्फी काढण्याचं खुळ इतकं लोकांच्या डोक्यात भिनलं आहे की जो तो सेल्फीसाठी पाहीजे ती किंमत मोजायला तयार असतो. सेल्फीच्या क्रेजमुळे काही लोकांच्या जीवावर देखील बेतले आहे. आता तर मोबाईल कंपन्यांनी बाजारात खास सेल्फी फोन आणले आहेत. आणि मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याची क्वालीट वाढवून त्याची जाहीरात करणेही चालू केले आहे. सेल्फी काढण्याची अबालवृद्धांची क्रेज पाहून राजकारणी लोकांनी सेल्फी पॉईंट देखील स्थापन केले आहेत. परंतू पहिला सेल्फी कोणी आणि कधी काढला होता हे तुम्हाला माहीती आहे का? कारण याचा इतिहास मोठा रंजक आहे.
पहिल्या सेल्फीचा इतिहास
तुम्हाला वाटत असेल की सेल्फीचा वेड आता दहा ते पंधरा वर्षांपूर्वीचे आहे. परंतू असे नाही. परंतू पहीली सेल्फी सुमारे 200 वर्षांपूर्वी काढली होती हे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहाणार नाही. साल 1839 मध्ये 30 वर्षीय रॉबर्ट कॉर्नेलियस यांनी फिलाडेल्फियामध्ये सेल्फी घेतला होता. रॉबर्ट यांनी वडिलांच्या दुकानाच्या मागे कॅमेरा लावला. यानंतर त्याने लेन्स कॅप काढली, फ्रेमसमोर 5 मिनिटे उभे राहीला आणि लेन्सची कॅप परत लावली. त्यानंतर जो फोटो तयार झाला त्याला पहिले सेल्फ पोर्ट्रेट असे म्हटले जाते. आणि आजच्या भाषेत त्याला ‘सेल्फी’ म्हणतात. यानंतर रॉबर्ट हे प्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या वडिलांचा लॅंपचा व्यवसाय होता, जो त्यांनी 20 वर्षे चालवला. पुढे रॉबर्ट यांनी अमेरिकेतील सर्वात मोठा लॅंपचा व्यावसायिक म्हणून आपल्या व्यवसायाला नवी ओळख दिली. काही तज्ज्ञांच्या मते रॉबर्ट यांना त्याचा पहिला ‘सेल्फी’ घेण्यासाठी 3 मिनिटे लागली. हा फोटो काढल्यानंतर त्याने लिहिले होते की ‘The first light picture ever taken’
1966 मध्ये अंतराळवीराने काढला सेल्फी
अमेरिकीचे अंतराळवीर बझ एल्ड्रीन यांनी 1966 मध्ये जेमिनी 12 मिशन दरम्यान अंतराळात सेल्फी घेतली होती. काही लोकांच्या मते हा पहीला सेल्फी आहे. बझ एल्ड्रीन यांनी स्वत: ट्वीट करून त्यांना हा सेल्फी फोटो स्पेसमध्ये काढल्याचे म्हटले होते. या सेल्फीत त्यांच्या शिवाय बॅकग्राऊंडला पृथ्वी दिसत आहे. एका टीव्ही चॅनलवर बोलताना त्यांनी त्यावेळी मला अंदाज नव्हता की मी जे करत आहे तो एक सेल्फी आहे. 1966 मध्ये आपल्या ट्रेनिंग मिशनमध्ये एल्ड्रीन एक्स्ट्रा व्हीक्युलर ऐक्टीविटीची तपासणी करीत होते. त्यांनी अंतराळवीर म्हणून आपल्या करीयरची सुरुवात साल 1963 रोजी केली होती. बझ एल्ड्रीन नील आर्मस्ट्रॉंग नंतर चंद्रावर उतरणारा दुसरा मानव आहे.
2013 मध्ये सेल्फीला ओळख मिळाली
2013 मध्ये सेल्फी हा शब्द प्रतिष्ठित ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये अखेर समाविष्ट करण्यात आला. सेल्फीची अशी व्याख्या करण्यात आली. जो स्वत:च काढला आहे असा एक फोटो. किंवा आपल्या स्मार्टफोन वा वेबकॅमने स्वत:च काढलेला फोटो ज्याला कोणी सोशल मिडीयावर किंवा वेबसाईटवर पोस्ट केला आहे. Selfie ला साल 2013 मध्ये ऑक्सफोर्ड डिक्शनरीने word of the year ने गौरविले आहे.