सांगली : अभिनेते वैभव मांगले यांना नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच रंगमंचावर चक्कर आली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज अगोदर व्यक्त करण्यात आला, पण हृदयविकाराचा झटका आला नाही, असं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलंय. त्यांना उपचारासाठी सांगलीतील क्रांती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर वैभव मांगलेंना डिस्चार्ज देण्यात आलाय.
सांगलीत अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरु असताना हा प्रकार घडला. वैभव मांगले अचानक कोसळल्यानंतर प्रयोग थांबविण्यात आला. प्रयोगासाठी शेवटचे पाच मिनिटे उरले होते. वैभव मांगले उकाड्यामुळे कोसळल्याचं अगोदर सांगण्यात आलं. यानंतर डॉक्टरांनी स्टेजवरच त्यांची तपासणी केली. यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
वैभव मांगले यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. अशक्तपणामुळे चक्कर आल्याचं त्यांनी सांगितलं. सांगलीत ऊन्हाचा तडाखा जास्त आहे. रगमंचावर एसी नसल्याने अणि हेवी मेकअप असल्याने मला अशक्तपणा आला. त्यामुळे चक्कर आली आणि कोसळलो. हृदयविकाराचा झटका नव्हता. मी आता व्यवस्थित आहे, अशी प्रतिक्रिया वैभव मांगले यांनी दिली.