घराच्या बाल्कनीत लावा ‘या’ वनस्पती, जेवणासह औषधांसाठीही करु शकता वापर
Home Gardening Tips: तुमच्याकडे बाल्कनी असेल तर तुम्ही तिथे काही औषधी वनस्पतीही लावू शकता. या वनस्पती आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे तुमच्या बाल्कनीचे सौंदर्य वाढते.
Home Gardening Tips : हिवाळ्यात लोकांना हिरव्या, ताज्या आणि औषधी वनस्पतींचे सेवन करणे आवडते. यासाठी बाल्कनीत, छतावर किंवा घराच्या आत वेगवेगळ्या प्रकारची झाडे लोक लावतात. अनेकांना आपल्या घरात किचन गार्डन बनवायला आवडतं. या गार्डनमध्ये जेवणात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती आणि मसाले पिकवता येतात. तेही अगदी सोप्या पद्धतीने, याविषयी जाणून घेऊया.
तुम्ही या औषधी वनस्पती वर्षभर घरात किंवा घराबाहेर वाढवू शकता. औषधी वनस्पती केवळ आपल्या अन्नाची चव वाढवत नाहीत तर त्याचे खूप फायदे देखील असतात. जर आपल्याकडे लहान बाल्कनी असेल तर आपण या औषधी वनस्पती आणि मसाले सहज वाढवू शकता.
कोथिंबीर : कोथिंबीर भारतीय स्वयंपाक घरातील अन्नाची चव वाढवण्याचे काम करते. ही अतिशय वेगाने वाढणारी औषधी वनस्पती आहे. बाल्कनीत त्याची वाढ करणे अत्यंत सोपे आहे. एका छोट्या भांड्यात धने घालून त्यावर माती टाकायची. त्याला पुरेसा सूर्यप्रकाश आणि पाणी मिळायला हवे. आठवडाभरात बिया उगवण्यास सुरवात होते.
शेवगा : शेवगा ही पौष्टिक औषधी वनस्पती आहे. यात लोह, व्हिटॅमिन A, C आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात. केस आणि त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर आहे. शेवग्याचे दाणे चांगल्या ओलसर जमिनीत पेरून उन्हात ठेवावे. ही मोठी वनस्पती आहे, त्यामुळे त्याला पुरेशी जागा द्या.
तुळस : आयुर्वेदात तुळशीला खूप महत्त्व मानले जाते. तुळशीचे आरोग्यासाठी ही अनेक फायदे आहेत. यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सर्दी, खोकला आणि संसर्ग रोखण्यास मदत करतात. तुळशीचे छोटे रोप एका भांड्यात ठेवा. 4-6 तास सूर्यप्रकाश दाखवा. हे लक्षात ठेवा की थंड हवामानात रात्री त्यांना बाहेर ठेवू नका.
पुदिना : पुदिन्याचा वापर ताजेपणा आणण्यासाठी केला जातो आणि तो अगदी सहज वाढतो. भांड्यात पुदिना पिकविण्यासाठी चांगल्या ओलाव्याच्या मातीचा वापर करावा. उन्हात ठेवा, परंतु अतिउष्णतेपासून त्याचे संरक्षण केले पाहिजे. ते कंटेनरमध्ये वाढविणे चांगले.
लसूण : लसणाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. बाल्कनीत लसूण पिकवणेही अत्यंत सोपे आहे. लसणाच्या पाकळ्या एका भांड्यात ठेवून हलक्या मातीने झाकून ठेवा. हलका सूर्यप्रकाश आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत लसूण पिकवा. त्याला नियमित पाणी द्या आणि लवकरच तुम्हाला लसणाचे ताजे कोंब दिसतील.