आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे ते वेगवेगळ्या आजारांमध्ये गुंतले जातात. पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. तरुण वयात व्यक्ती करिअरकडे अधिक लक्ष देतो. त्यामुळे त्याचे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होते. २५ ते ३० वय हे पुरुषांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. कारण या वेळेत त्यांचं करिअर घडत असते. इतकंच नाही तर त्या दरम्यान त्यांना संसार सुरु करण्यासाठी ही समाजातून आणि घरातून दबाव असतो. या सगळ्या कारणांमुळे तो चिंतीत असतो. या दरम्यान पुरुषांना वेगवेगळ्या समस्या येऊ शकतात. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे. सध्या ही समस्या वेगाने वाढत चालली आहे. मनुष्याच्या प्रजनन क्षमतेवर तर याचा परिणाम होतोच पण मानसिक तणाव देखील येतो.
पण अशा अनेक गोष्टी आहे ज्यांच्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ लागते. त्यापैकीच मधुमेह, हार्मोनल असंतुलन, लठ्ठपणा आणि काही लैंगिक संबंधातून पसरणारे आजार यांचा पुरुषावर नकारात्मक परिणाम होतो. पण जर वेळीच योग्य माहिती आणि उपचार घेतले तर ही समस्या टाळता येऊ शकते. असे तज्ज्ञ सांगतात.
व्हॅरिकोसेल : या समस्येत अंडकोषांच्या आतील नसा फुगतात. ज्यामुळे शुक्राणूंच्या उत्पादनावर परिणाम होतो. पुरुषांमध्ये वंध्यत्व येण्याचे हे एक मोठे कारण आहे.
हार्मोनल असंतुलन : टेस्टोस्टेरॉन आणि इतर पुनरुत्पादक हार्मोन्सचे असंतुलन हे शुक्राणूंच्या संख्येवर थेट परिणाम करत असतात. थायरॉईड, पिट्यूटरी ग्रंथी किंवा इतर हार्मोनल अडथळ्यांमुळे ही परिस्थिती उद्भवते.
संसर्ग : काही जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्गांमुळे देखील शुक्राणूंची संख्या कमी होते. जसे की, गोनोरिया किंवा नागीण, शुक्राणूंच्या उत्पादनास आणि त्यांच्या गुणवत्तेला ती हानी पोहोचवू शकते.
मधुमेह आणि लठ्ठपणा : मधुमेह आणि लठ्ठपणा ही आता सामान्य समस्या होत चालली आहे. चुकीच्या जीवनशैलीने ही वाढत आहे. पण याचा दुसरा परिणाम हा शुक्राणूंवर देखील होतो. ज्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.
ऑटोइम्यून डिसऑर्डर : शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कधीकधी स्वतःच शुक्राणू नष्ट करते. ज्यामुळे देखील शुक्राणूंची संख्या कमी होत जाते.
जर कोणतीही समस्या वेळेत सोडवली तर त्याचे परिणाम होत नाहीत. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. तणावाचे योग्य व्यवस्थापन केले तर प्रजनन क्षमता सुधारु शकते. पण खूप प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर ताबतोब तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. कोणतीही लक्षणे आढळली तरी त्याची योग्य माहिती घेऊन उपचार घेतले पाहिजे.
अस्वीकरण: ही बातमी फक्त तुम्हाला सामान्य माहिती म्हणून देण्यात आली आहे. हा कोणताही सल्ला नाहीये. कोणतीही समस्या असेल तर त्यासाठी फक्त तज्ज्ञांचाच सल्ला घेतला पाहिजे.