माजी मंत्री आणि महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी बुधवारी जत येथील सभेत बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांना त्यांच्या तोंडासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? असं वक्तव्य खोत यांनी केलं आहे. त्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं असून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील खोत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमंक काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी देखील या वक्तव्यावरून सदाभाऊ खोत यांचे कान टोचले आहेत. मी सांगितलना प्रत्येकानं बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे. वाचाळविरांना थांबवलं गेलं पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील राजकीय लोक काहीही बोलतात असं अजिद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली या भेटीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली, त्याकरता मी आलो होतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान जीथे-जीथे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत, तीथे-तीथे मी सगळीकडे सभा घेणार. जेवढ्या सभा होतील तेवढ्या सगळ्या सभा घेणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी जाहीर नाम्यात केलेल्या घोषणांवरून देखील त्यांनी हल्लाबोल केला. त्यांनी जे जाहीर केलं, त्याचा सगळा हिशोब जातो तीन लाख कोटींवर. कर्ज राहुद्या बाजुला, विकासासाठी कोठून पैसा आणणार. उगच काहीही सांगायचं, आम्ही देऊ शकत नाही असं विरोधक म्हणतात, आणि तुम्ही आहे त्यामध्ये वाढ करता, जादूची कांडी फिरवणार आहात का? असा सवाल करतानाच ही निव्वळ जनतेची फसवणूक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता विरोधकांकडून सरकारची जोरदार कोंडी होण्याची शक्यता आहे.