महेंद्र कुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, बीड | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. मराठा आंदोलकांनी आमदार आणि खासदारांची वाहने अडवण्यास सुरुवात केली आहे. त्यांना जाब विचारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांचा राजीनामाही मागितला जात आहे. काल खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. तर आज मराठा आंदोलकांनी थेट अजितदादा गटाच्या आमदाराचा बंगलाच पेटवून दिला. आंदोलकांनी आधी तुफान दगडफेक केली आणि नंतर हा बंगला पेटवून दिला. त्यामुळे संपूर्ण बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटवून दिला आहे. प्रकाश सोळंके हे अजितदादा गटाचे माजलगावचे आमदार आहेत. माजलगावमध्ये त्यांचा भला मोठा बंगला आहे. दुपारी अचानक आंदोलकांचा मोठा जमाव आला. त्यांनी प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर काही लोक अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी सोळंके यांच्या बंगल्यावर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
यावेळी पोलीसही घटनास्थळी होते. पण जमाव इतका आक्रमक होता की पोलिसांना नुसतं बघत राहण्याशिवाय काहीच करता आलं नाही. त्यानंतर या आंदोलकांनी बंगल्याच्या खाली पार्क केलेल्या तीन कार जाळण्यात आल्या. आधी या कार फोडल्या. त्यानंतर त्यांना आग लावली. त्यानंतर 10 दुचाकीही पेटवून देण्यात आल्या. त्यामुळे बघता बघता आग पेटली आणि अख्खा बंगलाच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संतप्त जमावाने आग लावल्याने माजलगावमध्ये तणावाचे वातावरण आहे. सोळंके यांच्या बंगल्याच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मावळमध्ये ठिकठिकाणी उपोषण सुरु करण्यात आलं आहे. मात्र कार्ला येथील मराठा आंदोलकांनी थेट पाण्यात उडी घेत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय या आंदोलकांनी घेतला आहे. यावेळी सरकारचा धिक्कार करून निषेध नोंदविण्यात आला.