नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसने गमावली सीट

| Updated on: Nov 23, 2024 | 9:13 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवल्यानंतर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने येथून विजय मिळवला होता. पण पाच महिन्यातच येथे मोठी उलथापालथ झाली आणि काँग्रेसला मोठा झटका बसलाय.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसने गमावली सीट
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट पाहायला मिळाली. महाविकास आघाडी चारी मुंड्या चीत झाली. भाजप युती पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. पण विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजपने बाजी मारलीये. येथून भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसचा दारुण पराभव केलाय. नांदेड पोटनिवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला मोठा धक्का बसला. कारण ही जागा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकावण्यासोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपने विजय मिळवला. भाजपचे उमेदवार डॉ.संतुकराव हुंबर्डे हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांचा दारूण पराभव केलाय. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, संतुकराव यांना 5,00,368 मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना 4,42,279 मते मिळाली. ते दुसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघाडीचे अविनाश विश्वनाथ (61224) तिसऱ्या क्रमांकावर होते.

काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेड लोकसभा जागेवर ही पोटनिवडणूक झाली. ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील यांचा सुमारे 60 हजार मतांनी पराभव केला होता.

महायुतीचा विजयाचा पॅटर्न लोकसभा पोटनिवडणुकीतही पहायला मिळाला. नांदेड लोकसभा मतदारसंघात पाच महिन्यांआधी काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला होता. मात्र पाच महिन्यात निकालात उलथापालथ झाली. विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुक झाली होती. ज्यामध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे लोकसभेत भाजपची एक जागा वाढसी असून काँग्रेसची एक जागा कमी झाली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी भाजप महायुतीने २३० जागांवर आघाडी घेतली तर महाविकासआघाडीला ४६ जागाच मिळू शकल्या. भाजपला आतापर्यंत १३२ जागा, शिवसेनेला ५७ जागा आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर महाविकासआघाडीतील काँग्रेसला १६ जागा, ठाकरे गटाला २० जागा आणि शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या आहेत.