उस्मानाबाद : पीक विमा व अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी उस्मानाबादचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा त्यांचा 6 वा दिवस आहे. आमदार कैलास पाटील यांना भेटण्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे हे उपोषण स्थळी आले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमदार कैलास पाटील यांची फोन वरून चर्चा करुन दिली.
अखेर 6 दिवसाच्या आमरण उपोषण आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. 282 कोटी रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी दिली.
बजाज अलायन्स विमा कंपनी आहे ज्यांनी 2020 चा विमा सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही दिला नाही. जिल्हाधिकारी यांनी निधी मागणीचा प्रस्ताव बाबतचे पत्र थेट मुख्यमंत्री यांना पाठविले. किमान मुख्यमंत्री यांचं तरी ऐका, असं जिल्हाधिकारी हे कैलास पाटील यांना म्हणाले.
नुकसानभरपाई निधी लवकर मंजूर करू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार कैलास पाटील यांना दिले. परंतु, तरीही आमदार कैलास पाटील हे उपोषणावर ठाम आहेत.
जोपर्यंत निधी खात्यात जमा होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं कैलास पाटील यांचं म्हणणंय. त्यामुळं हे उपोषण चिघळण्याची चिन्हे आहेत.
गेल्या सहा दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत गाळून आंदोलन करण्यात आले. जलसमाधी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनात जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली.