सोलापूर : राज्यासह देशभरात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. या कोरोनावर लसीकरण हाच एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात अनेक लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी शेकडोंची गर्दी बघायला मिळत आहे. मात्र, सोलापुरातील एका गावात गावकऱ्यांना लसीकरणाचे चांगलेच वावडे आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मृत्यू होतो, अशी अफवा गावात पसरली आहे. त्यामुळे आख्खं गाव लसीकरणास हवा तसा प्रतिसाद देताना दिसत नाही (Villagers not taking corona vaccine due to rumour).
धारसंग ! सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील 500 लोकसंख्या असलेलं शेवटचं गाव. हे गाव तालुक्यापासून 43 किमी लांब आहे. तालुक्याहून गावाला जायचा रस्ता इतका खराब आहे की, तिथे दुचाकीही नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. गावकऱ्यांनी गावत कधी बस आलेली पाहिली नाही. गावातील सध्याची परिस्थिती पाहता हे गाव अनेक काळापासून लॉकडाऊनमध्येच जगत आहे, असं वाटेल (Villagers not taking corona vaccine due to rumour).
कोरोना महामारीत गावातील नेमकी परिस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी आमचे सोलापूरचे प्रतिनिधी रोहित पाटील या गावात गेले. या गावात पोहोचल्यानंतर हे गाव प्रगत समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील आहे, असं तसूभरही वाटणार नाही. कोरोना संकट काळात या गावात सुदैवाने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. पण सोलापुरातील इतर ग्रामीण भागात कोरोना फोफावला आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. पण धारसंग गावाला लसीकराचे वावडे आहे. लस घेतल्यानंतर आम्ही मरुन जाऊ, अशी भीती गावकऱ्यांना आहे.
“आम्ही गाव सोडून बाहेर जातच नाही. याशिवाय गाव शेवटच्या टोकाला आहे. गावाला रस्ताच नसल्यामुळे आमचा तालुक्याशी संपर्क येत नाही. त्यामुळे आम्हाला कोरोना संसर्ग होत नाही”, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली. गावात लसीच्या बाबतीत अनेक अफवा पसरल्या गेल्या आहेत. त्यामुळे गावातील लोकांनी लस घेतली नाही. गावकरी आरोग्य विभागाची टीम घरापर्यंत आल्यानंतर लस घेण्याच्या तारखेला आम्ही येतो म्हणतात आणि त्यादिवशी कुणी घराबाहेर येत नाही, कुणी शेतीचा सहारा घेतो.
लोकांना लसीच्या बाबतीत असलेले गैरसमज दूर व्हावेत यासाठी गावातच फ्रंटलाईनमध्ये काम करणारे पोलीस पाटील, आशा वर्कर, ग्रामपंचायत शिपाई अशा केवळ 12 जणांनी लस घेतली आहे. धारसंग गावात शेजारच्या उपकेंद्रातून रोज आरोग्य विभागाच्या पथकामार्फत गावकऱ्यांचे समुदेशन केले जाते. गावकरी तेवढ्या वेळेपुरते हो हो म्हणतात, मात्र पुन्हा पहिले पाढे पंचावन्नच. त्यामुळे आरोग्य विभागाचे लोक हतबल झाले आहेत.
गावाला जोडणारा एकमेव रस्ता तोही व्यवस्थित नाही. त्यामुळे या रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तरीही ना गावाचा रस्ता झाला, ना त्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे आजही गाव शहराशी तर दूरच तालुक्याच्या सुद्धा संपर्कात नाही.
सरकारी योजना पोहचण्यासाठी गावात मर्यादा येत आहेत. शिवाय गावातील 50 टक्के लोक शेतकरी आणि 50 टक्के मजूर असल्यामुळे शेजारच्या गावात काय चाललंय याच्याशी गावकऱ्यांनाही काहीच देणंघेणं नाही. सध्या गावात एकही रुग्ण नसला ही बाब समाधानाची असली तरी गावकऱ्यांना लसीकरणापासून दूर राहता येणार नाही. त्यांनी यापासून गाफील न राहता आणि अफवांना बळी न पडता लस घ्यावी, असं ‘टीव्ही 9 मराठी’चं सुद्धा आवाहन आहे.
हेही वाचा :
साताऱ्यानं राज्याचं टेन्शन वाढवलं, कोरोना पॉझिटिव्हीटीमध्ये अग्रेसर, मृत्यूदर कमी करण्याचं आव्हान
‘रेमडेसिव्हीर’चा काळाबाजार, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; 85 इंजेक्शन जप्त, 9 जणांना अटक