Ajit Pawar | आज त्रिशूळ धुळ्यामध्ये धडकणार, अजित पवार शरद पवार यांना काय उत्तर देणार?
Ajit Pawar | शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राजकीय मैदानात उतरले आहेत. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघडी असा सामना सुरु झाला आहे.
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राजकीय मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनी शनिवारी नाशिकच्या येवला मतदारसंघात सभा घेतली. हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे.
उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघात सभा घेतली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोन्ही नेत्यांनी महायुतीच्या सरकारचा समाचार घेतला.
भाजपा बाजार बुडव्यांचा पक्ष
“भारतीय जनता पक्ष हा बाजार बुडव्यांचा पक्ष झाला आहे. आधी भाजपमध्ये चांगली लोकं होती. पण, आता भ्रष्टाचाराने माखलेले लोकं भाजपमध्ये आले आहेत. दुसऱ्या पक्षातले तुमच्याकडे येतात. तुम्ही सतरंज्या हातरण्याचं काम करता. ही लाचारी नाही का” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
तिन्ही नेते एकत्र येणार
आज या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार? याकडे राज्याच्या जनतेच लक्ष लागलं आहे. आज धुळ्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. याआधी गडचिरोली येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला हे तिन्ही नेते एकत्र आले होते.
त्रिशूळचा वार कोणावर? त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तिघांचा ‘त्रिशूळ’ असा उल्लेख केला होता. हे राज्याच्या विकासाच त्रिशूळ असल्याच म्हटलं होतं. आज हे त्रिशूळ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या टीकेला काय उत्तर देणार? याकडे राज्याच्या जनतेच लक्ष लागलं आहे.
#धुळे येथे उद्या (दि.१० जुलै) मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या प्रमुख उपस्थितीत #शासन_आपल्या_दारी चे आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार. pic.twitter.com/dyDJL5aplH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 9, 2023
कार्यक्रमासाठी 200 पेक्षा अधिकच्या बसेसची व्यवस्था
आज धुळ्यात एसआरपीएफ मैदान येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या ठिकाणी सुमारे पंधरा हजार नागरिक बसू शकतात, असा भव्य दिव्य मंडप टाकण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. याठिकाणी उपस्थित नागरीक व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या 19 विविध विभागांचे माहितीपूर्ण 34 स्टॉल लावण्यात आले आहेत. ‘या कार्यक्रमासाठी 200 पेक्षा अधिकच्या बसेसची व्यवस्था नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी धुळे शहर सजलं आहे. पहिल्यांदाच शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे एकाच ठिकाणी लावण्यात आले आहेत. शहरात विविध ठिकाणी तिन्ही पक्षांच्या झेंड्यांबरोबर प्रत्येकाने आपल्या नेत्यांचे स्वागताचे बॅनर लावले आहेत.