कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने रखडली, काय आहे प्रकार

| Updated on: Jan 08, 2024 | 1:55 PM

Onion Exprot Ban | कांद्याला नोव्हेंबर महिन्यात 3800 शेती 4200 रुपये प्रति क्विंटल चांगला बाजारभाव मिळतो. परंतु यंदा कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर घसरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दीड ते 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान झाले.

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने रखडली, काय आहे प्रकार
Follow us on

उमेश पारीक, नाशिक, दि. 8 जानेवारी 2024 | यंदा कांद्याने शेतकऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. शेतकऱ्यांच्या घरातील शुभकार्य कांद्यामुळे रखडले आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्यानंतर धुमधडाक्यात लग्नसराईला सुरुवात होते. हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुगीचा असतो. कारण कांद्याला नोव्हेंबर महिन्यात 3800 शेती 4200 रुपये प्रति क्विंटल चांगला बाजारभाव मिळतो. यामुळे या हंगामात मिळणाऱ्या पैशांमुळे कांदा उत्पादक शेतकरी मुलामुलींचे लग्न जमवतात. परंतु यंदा सर्व गणित उलटे झाले आहे. यंदा कांद्याला भाव नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. आर्थिक टंचाईमुळे त्यांच्या घरातील लग्न आणि इतर शुभकार्य रखडले आहेत.

निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरात घसरण

कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर कांद्याचे बाजार भाव 1800 ते 2000 रुपयांपर्यंत खाली आले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल मागे दोन हजार रुपयांचा तोटा झाला. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे हंगामात दीड ते 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान होत आहे. कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचे की मुला मुलींचे लग्न करायचे अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मुला, मुलींची लग्न पुढे ढकलली आहे. बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आलेल्या कांदा उत्पादकांनी व्यापाऱ्यांशी बोलताना ही माहिती दिली.

नाशिक जिल्ह्यात 500 ते 550 कोटींचे नुकसान

कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 500 ते 550 कोटींचे तर राज्यातील शेतकऱ्यांचे 1200 ते 1500 कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे केंद्र सरकारने आतातरी निर्यातबंदी मागे घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

बंदचा निर्णयाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

शेतीमालाच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे हस्तक्षेप वाढल्याने याला विरोध करण्यासाठी नाशिक येथे झालेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत 8 जानेवारीपासून सर्व शेतकरी हे संपावर जातील असा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वांच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरळीत सुरु आहे लासलगाव बाजार समितीत आज सकाळच्या सत्रात साडेपाचशे वाहनातून लाल कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे. या कांद्याला जास्तीत जास्त 1920 रुपये, सरासरी 1840 रुपये तर कमीतकमी 800 रुपये इतका प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला.