खर्चाच्या मर्यादेत वाढ, राहत्या घरी मतदानाचा हक्क अन्…; सर्वपक्षीय बैठकीत निवडणूक आयोगाला देण्यात आल्या ‘या’ सूचना

| Updated on: Sep 27, 2024 | 3:48 PM

माजी खासदार राहुल शेवाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "राहत्या घरी मतदानाचा हक्क द्यावा", अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली.

खर्चाच्या मर्यादेत वाढ, राहत्या घरी मतदानाचा हक्क अन्...; सर्वपक्षीय बैठकीत निवडणूक आयोगाला देण्यात आल्या या सूचना
Follow us on

Central Election Commission in mumbai : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. एकीकडे पक्षांमध्ये जागावाटप, मुख्यमंत्रिपद याबद्दल चर्चा सुरु असताना दुसरीकडे सत्ताधारी विरोधकामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत काही नेत्यांनी निवडणूक आयोगाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी निवडणूक आयोगाकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान निवडणूक आयोगाला काही सूचना करण्यात आल्या. या बैठकीनंतर माजी खासदार राहुल शेवाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राहत्या घरी मतदानाचा हक्क द्यावा, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली.

राहत्या घरी मतदानाचा हक्क द्यावा

यावेळी प्रत्येक पक्षातील नेते निवडणूक आयोगाच्या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाला काही सूचना केल्या आहेत. यावेळी शिवसेनेचे पाच ते सहा नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी आम्ही निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की वयोवृध्दांचं वय हे 85 वरून 80 पर्यंत आणावं. तसेच राहत्या घरी मतदानाचा हक्क द्यावा, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

होर्डिंग बॅनरचा टॅक्स हा समान असावा. महानगरपालिकेचा वेगळा आहे. त्यामुळे हा खर्च एकसारखा असावा, अशी मागणीही केली. तसेच निवडणूक खर्चाची २० लाखाची मर्यादा वाढवा. तसेच पीडब्ल्यूडीचा जो रेट आहे तो रेट न धरता मार्केट रेट धरावा, अशी मागणीही राहुल शेवाळे यांनी केली.

टप्प्यात निवडणुका घ्या

काही मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था नव्हती. काही ठिकाणी मोठी रांग असल्याने मतदान करायला मिळाले नाही. या सगळ्या त्रुटी दूर व्हायला हव्या अशी मागणीही आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच टप्प्यात निवडणुका घ्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले.