चर्चा निष्फळ, राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा ठप्प, हजारो टँकर पेट्रोल कंपन्यांच्या डेपोबाहेर
petrol diesel company truck drivers strike | राज्यातील इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला आहे. सोमवारपासून हा संप सुरु झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. मनमाड येथे सर्वच इंधन कंपन्यांचे डेपो आहेत. या डेपोमधून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात इंधन पुरवठा केला जातो.
मनोहर शेवाळे, मनमाड, दि. 2 जानेवारी 2024 | केंद्र शासनाने आणलेल्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक, टँकर चालकांनी देशव्यापी संप सुरु केला आहे. या संपात महाराष्ट्रातील ट्रक आणि टँकर चालक सहभागी झाले आहेत. यामुळे राज्यातील पेट्रोल पंपांना होणार इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. मनमाड येथील एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लँटमधून राज्यातील अनेक भागांत इंधन पुरवठा होतो. संपामुळे हजारो टँकर डेपो बाहेर थांबले आहेत. यासंदर्भात सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकारी आणि टँकर आणि ट्रक चालक, मालक यांच्या यांच्यात बैठक होत आहे.
मनमाडमधून उत्तर महाराष्ट्र, विदर्भात इंधन पुरवठा
मनमाड येथे सर्वच इंधन कंपन्यांचे डेपो आहेत. या डेपोमधून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात इंधन पुरवठा केला जातो. संपामुळे या ठिकाणावरुन होणारा पेट्रोल अन् डिझेलचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रकल्पातून इंधन आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारे टँकर बाहेरच पडले नाहीत. वाहन चालकांचे इंधन प्रकल्पाबाहेर आंदोलन सुरू आहे. इंधन व गॅस प्रकल्पातून वाहतूक करणाऱ्या १५०० वाहनांची चाके थांबली आहेत. मनमाड येथील इंधन प्रकल्पातून करण्यात येणारा इंधन पुरवठा ठप्प झाल्यामुळे आता उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अन् खानदेशात इंधन तुटवडा जाणवणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंपांमधील इंधन संपत आहेत.
आज पुन्हा बैठक
वाहनचालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी महसूल अधिकारी, प्रकल्प अधिकारी, आर.टी.ओ. आणि पोलीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारीसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोमवारी यासंदर्भात दोन बैठका झाल्या. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे आज पुन्हा बैठक होणार आहे. शिर्डीत वाहनधारकांना जिओचा दिलासा मिळत आहे. रिलायन्स कंपनीचे पेट्रोल पंप सुरू असल्याने दिलासा मिळत आहे. इंधन भरण्यासाठी या पंपावर वाहनधारकांची गर्दी झाली आहे.
जळगावात साठा संपला
टँकर चालकांचे राज्यभरात संप सुरू असून या संपाचा परिणाम जळगाव जिल्हा सुद्धा झाल्याचा पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या महितीमुळे मध्यरात्री जळगावातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तुफान गर्दी झाली होती. या सर्व व वाहनधारकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केल्यामुळे दुसऱ्या दिवशी या पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला असून या ठिकाणी पेट्रोल शिल्लक नसल्याचे बोर्ड लावण्यात आला आहे.