जिगरबाज अजहर शेख! स्वतः 65% आगीत होरपळला, पण 9 जणांना वाचवलं
लातूर-नांदेड महामार्गावर डिझेल टँकरच्या अपघातात 7 वाहनं जळाली! या अपघातात 9 जणांना वाचवणाऱ्या तरुणाची थरारक गोष्ट
लातूर : लातूर-नांदेड महामार्गावर डिझेल टँकरने ऊसाच्या ट्रॉलीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला होता. बुधवारी रात्री झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. मात्र ही घटना इतकी भयंकर होती, की या अपघातानंतर महामार्गावरुन जाणाऱ्या एकूण 7 वाहनं जळून खाक झाली होती. याच अपघाताची एक थरारक गोष्ट समोर आली आहे.
भीषण अपघातानंतर नांदेडहून लातूरला जाणाऱ्या एका एसटी बसलाही आगीने कवेत घेतलं होतं. या एसटी बसमधून एका जिगरबाज तरुणाने थरारक पद्धतीने सुटका केलीय. 9 प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी या तरुणाने स्वतःचा जीवही धोक्यात घातला होता. हा तरुण आता 65 टक्के भाजलाय. सध्या त्याच्यावरु रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
अजहर शेख या तरुणीने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून घाबरुन न जाता हिंमत दाखवली. एसटी बसलाही अपघातानंतर आग लागली होती. ही आग बघता बघता वाढत होती. पण अजहर शेख या तरुणाने लाथ मारुन एसटी बसची पाठीमागील काच फोडली. त्यानंतर आप्तकालीन खिडकून एसटी बसमधील 9 प्रवाशांना अजहर याने बाहेर काढलं आणि त्यांना वाचवलं. पण हे करत असताना त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता.
अजहर स्वतः आगीत 65 टक्के होरपळला. अजहर हा मूळचा शिरुर ताजबंद येथील असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाककीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांकडून त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
नांदेडहून लातूरला जाणाऱ्या एसटी बसमध्ये एकूण 13 प्रवासी होते. यापैकी 9 प्रवाशांचा जीव वाचण्यात अजहर याला यश आलं. तर 6 प्रवासी जखमी झाले. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लातूरहून निघालेला डिझेलचा टँकर अहमदपूरच्य दिशेने निघाला होता. त्यादरम्यान, या भरधाव टँकरने ऊस ट्रॉलीला धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की यानंतर स्फोट झाला. स्फोटानंतर डिझेल टँकरने पेट घेतला.
शिवाय रस्त्यावरील दोन खासगी वाहनं, एक एसटी बस, एक ट्रॅक्टरने पेट घेतला होता. यावेळी महामार्गावर उसळलेला आगडोंब पाहून वाहतूकही थांबवावी लागली होती. या आगीत डिझेल टँकरचा चालक वाचला. पण त्याच्या क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला.