भिवंडी तालुक्यातील मौजे लोनाड गावाच्या हद्दीतील पॅरामाउंट लॉजीट्रेड गोदाम संकुलातील नालीमध्ये बिबट्या अडकून पडला आहे. त्याठिकाणी वनविभागाचे अधिकारी सापळा घेऊन दाखल झाले असून त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री याच परिसरात बिबट्या आला असता आई एकवीरा ढाबा यांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पॅरामाउंट लॉजीट्रेड गोदाम संकुलातील सडॉफेक्स कंपनीचा बस चालक दुर्गेश विश्वकर्मा हा या ठिकाणी बसमध्येच रहातो. तो पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास उठून नजीकच्या आई एकवीरा ढाबा येथे अंघोळ करून बसमध्ये जात होता. यावेळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास ढाब्याच्या मागील बाजूकडून गुर्गुरण्याचा आवाज आला. त्याने लागलीच बसमध्ये धाव घेतली. त्यावेळी त्याला तेथून बिबट्या येत असताना दिसला.
बिबट्या दोन गोदामांच्यामधील गल्लीतून जाण्याचा प्रयत्न करीत असताना तेथील नाल्यामध्ये अडकून पडला आहे. दुर्गेश विश्वकर्मा याने प्रसंगावधान राखत गल्लीच्या तोंडावर प्लायवूड लावून रस्ता बंद करून ठेवला. त्यामुळे बिबट्या तेथून निसटू शकला नाही. अन्यथा सकाळच्या सुमारास त्याने नागरिकांवर हल्ला केला असता.
दरम्यान, आरडाओरड करीत ही घटना ढाबा चालकास सांगितल्यावर सीसीटीव्ही तपासले असता ही घटना खरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर स्थानिक पडघा पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी रेस्क्यू पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू पथक सकाळी दहा वाजता परिसरात दाखल झाले. त्यानंतर वन विभागाचे पथक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.