महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. विशेष म्हणजे भाजपकडून तब्बल 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गट आणि अजित पवार गटाची पहिली यादी देखील आज रात्री उशिरा किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. यानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 33 उमेदवारांची नावे निश्चित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तासगावातून दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना तिकीट देण्यात येणार आहे. याबाबत उद्या अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा होणार आहे.
विशेष म्हणजे शरद पवार गटाच्या 20 उमेदवारांची संभाव्य यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. तासगावमधून रोहित पाटील, इस्लामपूरमधून जयंत पाटील, तर कळवा-मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घनसावंगी येथून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षात मोठी इनकमिंग बघायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवार गटाचं सध्या पारडं जड आहे. असं असली तरी शरद पवार यांच्या पक्षाते किती उमेदवार जिंकून येणार? ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.