मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख आली समोर, प्रवीण दरेकर यांची महत्त्वाची माहिती; घोडं कुठं आडलं? सांगितलं कारण
आपण चिंता करू नका जे होईल ते शाश्वत आणि भक्कम होईल. संजय राऊतांनी सकाळची बडबड सुरू ठेवा, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.
Maharashtra Cabinet Formation : महाराष्ट्रात महायुतीने सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झाले असेल तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. त्यातच आता भाजपच्या एका नेत्याने मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख सांगितली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात महायुती सरकारच्या काही बैठका पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सध्या अनेक नेते भेट देताना दिसत आहेत. यामुळे मंत्रिपदासाठीचे लॉबिंग वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली आहे.
येत्या 16 तारखेपर्यंत शपथविधी होईल
“मला पण सूत्रांकडून कळत आहे की गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा सुरु आहेत. पण सूत्रांच्या पुढे गाडी हालत नाही. आता येत्या 16 तारखेपर्यंत शपथविधी होईल, असे मला कळत आहे. दिल्लीतील नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळ थांबलेला असू शकतो. आज किंवा उद्या मंत्रिमंडळ विस्ताराची यादी दिल्लीत जाईल आणि त्यानंतर शपथविधी होईल”, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
“आम्ही राज्याच्या हितासाठी इथे आहोत. सत्तेची मलाई राऊतांना समजून आली. संजय राऊत हे विरोधी पक्षाचा नेते म्हणून बोलत असतात. सरकारच्या जनतेसाठी काम करत असतात. आपण चिंता करू नका जे होईल ते शाश्वत आणि भक्कम होईल. संजय राऊतांनी सकाळची बडबड सुरू ठेवा”, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.
बडबड करण्यापेक्षा कृती करा
“निराधार बोलण्याचे संजय राऊतांच काम आहे. कुठल्या फाईल आहेत, आमदार आहेत. ठाकरे आहेत त्यांना बोलायला सांगा. लोकशाहीत भूमिका मांडा, बडबड करण्यापेक्षा कृती करा”, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
तुम्ही सुस्तपणे मातोश्रीत बसले होते
“नागपुरचा मुख्यमंत्री झाल्याने वेगळा आनंद विभागाला होईल. विदर्भाच्या विकासाला गती देण्याची शाश्वती मिळू शकते. राजा व्यस्त कामात आहे, तुम्ही सुस्तपणे मातोश्रीत बसले होते. मंत्रालयात तुम्ही कामं करायला आला नाहीत. मोदीसाहेब काम करतात ते व्यस्त आहेत”, अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिले.