भाजप आणि शिंदेंमध्ये गृहखात्यावर अडल्याची माहिती आहे. दिल्लीत अमित शाहांसमोर शिंदेंनी गृहखात्याची मागणी केली. मात्र भाजप गृहखातं सोडण्यास तयार नाही. तर गृहखातं न मिळाल्यास उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही, अशी भूमिका शिंदेंनी घेतल्याची माहिती आहे. अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतरची एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली. काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, त्यामुळे सर्वांची काळजी घेतोय, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसच भाजपचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता, शिंदे कोणत्या भूमिकेत असतील? या प्रश्नाचं उत्तर अद्याप त्यांनी दिलेलं नाही.
दिल्लीत अमित शाहांसोबतच्या बैठकीतही एकनाथ शिंदेंना 2 ऑफर देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री, पण केंद्रात न जाण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे राहणार हे स्पष्ट झालं. आता ते सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री होणार की फक्त शिवसेना पक्षाचीच कमान मुख्य नेते म्हणून सांभाळणार ? हाही प्रश्न आहे. पण TV9ला मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंना गृहखातं पाहिजे आणि गृहखातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत. मात्र गृहमंत्रिपद सोडण्यास भाजप तयार नाही, त्यामुळे आता गृहखात्यावरुन पेच कायम आहे. जर भाजपने शिवसेनेला गृहमंत्रिपद दिलं नाही तर उपमुख्यमंत्रिपद शिंदे पक्षातील दुसऱ्या नेत्याला देणार.
जी परिस्थिती 2022 मध्ये शिंदेंच्या बंडानंतर फडणवीसांवर ओढावली होती. त्याच स्थितीत सध्या एकनाथ शिंदे आहेत. शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा करतानाच फडणवीसांनी आपण सरकार बाहेर राहणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र काही वेळातच केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्यास सांगितलं आणि सरकारमध्ये सहभागी होत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. आता तशीच विनंती शिंदेंना केल्याचं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
दिल्लीत जाण्याआधीच एकनाथ शिंदेंना, फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे माहिती होतं. मात्र त्या बदल्यात गृहखातं मिळेल अशी अपेक्षा शिंदेंना होती. पण तूर्तास तरी भाजप गृहखातं सोडण्यास तयार नाही. त्याचीच झलक फोटोतूनही दिसली. शाहांसोबतच्या भेटीचे जे फोटो समोर आले आहेत. त्यात फडणवीस आणि अजित पवार खूश आहेत. तर शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसतेय.
दिल्लीतल्या बैठकीनंतर महायुतीची वाटाघाटीसंदर्भात मुंबईतही बैठक होणार होती. मात्र शिंदे त्यांच्या दरेगावी 2 दिवसांसाठी गेलेत. त्यामुळे पुढचे 2 दिवस महायुतीची कोणतीही बैठक नाही. सध्या गृहखात्यावर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे अडलंय. मात्र दरेगावहून परतल्यावरच, गृहखात्यावरुन पुढची स्पष्टता येईल.