सुप्रिया सुळेंना विरोध, फडणवीस यांची भेट… अखेर उमेदवारीच रद्द; वंचितचा मोठा निर्णय
वंचित आघाडीने आपल्या प्रचारास दणक्यात सुरुवात केली आहे. वंचितचे सर्व उमेदवार मतदारसंघात कामाला लागले आहेत. कालच वसंत मोरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वसंत मोरे यांनी प्रचारास सुरुवातही केली आहे. वसंत मोरे यांच्या रुपाने पुण्यात तगडं आव्हान निर्माण झालं आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शरद पवार गटाच्या बारामतीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांना विरोध करणं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चांगलंच भोवलं आहे. वंचितचे शिरूरचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी पक्षाच्या बारामतीच्या निर्णयाविरोधात वर्तन केलं. त्यामुळे वंचित आघाडीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. आता त्यांच्या ऐवजी शिरूरमधून वंचित दुसरा उमेदवार देणार आहे. त्यामुळे मंगलदास बांदल यांना मैदानात लढण्यापूर्वीच मोठा झटका बसला आहे. वंचितने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीने ट्विट करून माहिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रद्द केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार ही उमेदवारी रद्द करण्यात आल्याचं वंचितने म्हटलं आहे.
फडणवीसांचीही भेट
दरम्यान, उमेदवारी घोषित झालेली असताना मंगलदास बांदल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. बांदल यांनी कालच इंदापुरात फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याची गंभीर दखलही वंचितने घेतली आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधासाठी ही भेट असल्यामुळे पक्षाने बांदल यांची उमेदवारी रद्द केली आहे.
वंचितचा दणक्यात प्रचार
दरम्यान, वंचित आघाडीने आपल्या प्रचारास दणक्यात सुरुवात केली आहे. वंचितचे सर्व उमेदवार मतदारसंघात कामाला लागले आहेत. कालच वसंत मोरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वसंत मोरे यांनी प्रचारास सुरुवातही केली आहे. वसंत मोरे यांच्या रुपाने पुण्यात तगडं आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोल्यातून लढत आहेत. आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. त्यामुळे आंबेडकर विजयी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.