एसटी बँकेत महाभूकंप, 12 संचालकांचं मोठं बंड; गुणरत्न सदावर्ते यांना प्रचंड मोठा धक्का
प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी महामंडळातील अस्तित्वाला फार मोठा धक्का बसला आहे. एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये महाभूकंप झाला आहे. एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बंड केलं आहे. या संचालकांनी वेगळी चूल मांडली आहे.
गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 26 डिसेंबर 2023 : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी महामंडळातील अस्तित्वाला फार मोठा धक्का बसला आहे. एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये महाभूकंप झाला आहे. एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी बंड केलं आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. या बंडामुळे एसटी महामंडळातील सदावर्ते यांचं वर्चस्व खालसा झालं आहे. थेट संचालकांनीच बंड करत वेगळी चूल मांडल्याने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आधी कर्मचाऱ्यांचं वकीलपत्र घेतलं. त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. त्यानंतर एसटी महामंडळाच्या निवडणुकांमध्ये आपलं पॅनलही उतरवलं. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने एसटी बँकेची संचालक मंडळाचा निवडणूक लढवली. या निवडणुकीत सदावर्ते यांच्या पॅनलला 19 पैकी 12 जागांवर विजय मिळाला. मात्र, कुरबुरी काही थांबेनात. अखेर या कुरबुरीचा कडेलोट झाला.
थोडी ना थोडकी…
एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी थेट गुणरत्न सदावर्तेंविरोधात बंड पुकारलं आहे. या सर्व संचालकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला जय महाराष्ट्र केल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे सर्वच्या सर्व 12 संचालक ट्रॅव्हलरमधून एसटी बँकेत पोहोचले. यावेळी त्यांनी एक पत्रही आणलं होतं. या संचालकांनी एसटी महामंडळाचे अतिरिक्त संचालक बिमनवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे वेगळा गट स्थापन करत असल्याचं स्पष्ट केल्याचंं वृत्त आहे. या 12 संचालकांनी सदावर्ते यांना काडीमोड देऊन वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे एसटी बँकेत पुन्हा निवडणुका होणार की या गटाला मान्यता मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
घोटाळ्याचा आरोप
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेत 450 कोटींचा घोटाळा झाल्याचा संचालकांचा आरोप आहे. त्यामुळे संचालकांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीच 14 संचालक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर आज या संचालकांनी थेट बंडाचं अस्त्र उगारल्याने सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या निमित्ताने संचालकांचा सदावर्ते यांच्यावर विश्वास नसल्याचंही अधोरेखित झालं आहे.
सामंत यांची भेट
दरम्यान, या बाराही संचालकांनी यापूर्वी उद्योगमंत्र उदय सामंत यांची भेट घेतली होती. उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांनी सामंत यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर, काही दिवसांपूर्वीच गुणरत्न सदावर्ते यांनीही सपत्नीक उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर या घडामोडी घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून राजकीय कयास लावले जात आहेत.