एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी खुशखबर; आजपासून लागू होणार ही सवलत
एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती. या योजनेला महिला सन्मान योजना असे नाव दिले. ही योजना आजपासून लागू होणार आहे.
मुंबई : राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांना खुशखबर दिली होती. त्यानुसार, एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती. ही योजना आजपासून लागू होणार आहे. ही महिलांसाठी मोठी बातमी आहे. ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांना बसप्रवासात ५० टक्के सवलत मिळते. ७५ वयापेक्षा जास्त असणाऱ्यांना एसटीने मोफत प्रवास करता येतो. विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना सवलत दिली जाते. शाळेत जाणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलींना तर मोफत प्रवास करता येतो. याच धर्तीवर महिलांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. पाहुयात या योजनेत महिलांना नेमकी काय सुट मिळणार आहे.
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली होती. एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जात आहे. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.
महिलांना ५० टक्के सवलत
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्केपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. सदर सवलतीची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे.
प्रवास करणाऱ्या महिलांना मिळणार लाभ
महिलांना ही सुविधा दिल्याने बहुधा प्रवास करणाऱ्या महिलांना याचा फायदा होणार आहे. काही महिला कामानिमित्त रोज प्रवास करतात, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. खासगी वाहनाने प्रवास करून जास्त पैसे खर्च करण्याऐवजी या महिला आता अर्ध्या तिकिटात एसटी बसने प्रवास करतील.