Aditya Thackeray : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर अशी 50 खोक्यांची ऑफर कुणी कसं देऊ शकतं? आदित्य ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल
गद्दार सरकारचे, तात्पुरत्या सरकारच्या मंत्र्यांचे वक्तव्य देशाने बारकाईने ऐकायला पाहिजे. पक्षाशी, कुटुंबप्रमुखांशी गद्दारी केली तर त्यांना गद्दारच म्हणणार, याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
मुंबई : मंत्री महोदय यांनी विधीमंडळाच्या (Assembly) पायऱ्यांवर आपल्याला 50 खोके हवेत का असे बोलले होते. सत्तेच्या मस्तीत अशी उत्तर कोण देऊ शकतो का, असा संतप्त सवाल शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांकडून आंदोलन सुरू असताना शिंदे गटातील नेत्यांकडून ’50 खोके हवेत का’ अशाप्रकारचे वक्तव्य आले. त्यावर आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेत शिंदे गट आणि भाजपाला (BJP) सत्तेची मस्ती आल्याची टीका केली आहे. आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 50-50 बिस्कीटांचे पुडे घेऊन घोषणाबाजी केली. आमच्या हातात 50-50 बिस्कीटांचे पुडे आहेत मात्र त्यांच्या हातात काय आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये आता मंत्री असलेले त्यावेळी गुवाहाटीला का गेले असा सवाल त्यांनी केला.
‘गद्दारांना गद्दारच म्हणणार’
गद्दार सरकारचे, तात्पुरत्या सरकारच्या मंत्र्यांचे वक्तव्य देशाने बारकाईने ऐकायला पाहिजे. पक्षाशी, कुटुंबप्रमुखांशी गद्दारी केली तर त्यांना गद्दारच म्हणणार, याचा पुनरुच्चारदेखील त्यांनी यावेळी केला. करुणा शर्मांविषयी विचारले असता खरे मुख्यमंत्री नेमके कोण आहेत, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला.
‘न्याय देवतेवर विश्वास’
सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेसंदर्भातील विविध याचिकांवर सुनावणी आहे. याबाबत न्याय देवतेवर विश्वास आहे, असे ते म्हणाले. तर अफझल खान वधाच्या देखाव्याची परवानगी नाकारण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. तथाकथित हिंदुत्ववादी सरकार असताना परवानगी का नाकारली जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
‘फक्त राजकीय घोषणाबाजी’
दहीहंडीबाबत केलेली घोषणा अद्याप जी. आर. निघालेला नाही. ही फक्त राजकीय घोषणाबाजी होती का, असे विचारत अजूनही कुणाला मदत मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले. तर जांबोरी मैदानात उत्सव झाला. त्यामुळे झालेले नुकसान हे पाहायला हवे. आम्ही त्या मैदानाचे नुकतेच सुशोभीकरण केले होते, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
काय घडले होते?
विधीमंडळ अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडी म्हणजेच विरोधी पक्षातर्फे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी 50 खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजीही करण्यात आली होती. यावेळी शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई तसेच इतर काही आमदारांनी तुम्हाला खोके हवेत का, असे म्हटले होते. याला विरोधी पक्षाने आक्षेप घेतला आहे.