5 तारखेला शपथविधी अन् 5 तारखेला 1000 कोटींची ऑर्डर? अंजली दमानिया यांचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल
पाच तारखेला शपथविधी आणि पाच तारखेला एक हजार कोटींची ऑर्डर ? ही ती ऑर्डर आहे. आता मला कळले की चार तारखेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत “मी तर शपथ घेणार” असे अजित पवारांनी का म्हटले, अशी पोस्ट दमानिया यांनी X वर केली आहे.
राज्यात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 तारखेला झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्याच दिवशी अजित पवार यांना दिलासा देणारी बातमी आली. अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली 1000 कोटींची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिल्लीतील कोर्टाने काढला. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी या ऑर्डरचा संबंध अजित पवार यांच्या चार तारखेच्या पत्रकार परिषदेतील वाक्यशी सोडला आहे. यासंदर्भात ट्विट त्यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची एक हजार कोटींची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली होती. अजित पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित या मालमत्ता होत्या. आता त्या मुक्त करण्याचे आदेश कोर्टाने 5 डिसेंबर रोजी दिले. 2021 मध्ये अजित पवार यांच्या या मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या होत्या. आता त्यांच्या या सर्व मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश मालमत्ता व्यवहार अपीलीय न्यायाधिकरणाने दिले आहेत.
५ तारखेला शपथ विधी आणि ही घ्या १००० कोटीची ऑर्डर ?
ही ती ऑर्डर
आता मला कळले की ४ तारखेला फडणवीस – शिंदे आणि अजित पवारांनी जी प्रेस कांफ्रेंस घेतली त्या प्रेस मधे
“मी तर शपथ घेणार” असे अजित पवारांनी का म्हटले pic.twitter.com/s21zvcgZ2i
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 7, 2024
अंजली दमानिया यांनी काय म्हटले?
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पाच तारखेला शपथविधी आणि पाच तारखेला एक हजार कोटींची ऑर्डर ? ही ती ऑर्डर आहे. आता मला कळले की चार तारखेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत “मी तर शपथ घेणार” असे अजित पवारांनी का म्हटले, अशी पोस्ट दमानिया यांनी X वर केली आहे. या पोस्टसोबत दमानिया यांनी कोर्टाची ऑर्डर जोडली आहे.
शाब्बास !
१००० कोटी ?
भाजप ला पाठिंबा द्या,
उप मुख्यमंत्रिपद घ्या आणि
जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात ? https://t.co/uJDghuP0zk
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 7, 2024
अंजली दमानिया यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये अजित पवार यांचे नाव घेतले नाही. त्यात म्हटले, शाब्बास ! १००० कोटी ? भाजपला पाठिंबा द्या, उपमुख्यमंत्रिपद घ्या आणि जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात ? तसेच अंजली दमानिया पत्रकार परिषदही घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.