मुंबई: बेस्ट (Best) उपक्रमाने नेहमीच मुंबईकर जनतेचा प्राधान्याने विचार केला आहे. मुंबईकरांचा (Mumbaikar) प्रवास सुलभ आणि सुखकर होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. याचाच एक भाग म्हणून अलिकडे महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalaxmi Race Course) येथे एका आगळ्यावेगळ्या बसथांब्याची रचना नमुना दाखल करण्यात आली होती.
या बसथांब्याला मुंबईकरांची पसंती मिळाल्यामुळे बेस्ट उपक्रमाने अशाच प्रकारचे 350 बसथांबे विकसित करण्याचे काम सुरु केले आहे. सदर कामासाठी लागणारा निधी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री मान. आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या निधीतून उपलब्ध होणार आहे.
अशाप्रकारे येत्या 6 ते 8 महिन्याच्या कालावधीत मुंबईतील जवळपास सर्वच बसथांबे पर्यावरणस्नेही आणि आकर्षक स्वरुपाचे असतील जेणेकरुन सदर बसथांब्यांवर बसगाडयांच्या प्रतिक्षेत थांबणा-या प्रवाशांना एक सुखद अनुभव बेस्ट उपक्रमाद्वारे देण्याचा विचार आहे.
मुंबईच्या सौंदर्यात भर घालणा-या या उपक्रमाच्या मदतीसाठी विविध कॉर्पोरेट हाऊसेस, बँका, उत्पादक संस्था, प्रसार माध्यम संस्था, तसेच अन्य व्यवसाय संस्थांनी त्यांच्या कार्पोरेट •सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडाद्वारे या नवीन बसथांब्याच्या बांधकाम व देखरेखीसाठी सहकार्य करावे असे बेस्ट उपक्रमाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. अशा व्यवसाय संस्थांना बेस्ट उपक्रमाद्वारे जाहिरात दरांमध्ये सवलत देण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांकरिता स्मार्ट कार्ड तसेच मोबाईल अॅपद्वारे मोफत प्रवासाची सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ऑन लाईन म्हणजेच अॅपद्वारे तसेच ऑफलाईन देखील अर्ज करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आगारात येण्याची गरज भासणार नाही. या योजनेची संपूर्ण माहिती बेस्ट उपक्रमाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.