नांदेड: देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने काँग्रेसचं बळ वाढलं आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मेव्हणे आणि काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी मोठं विधान केलं आहे. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, असं भास्करराव पाटील खतगावकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांच्या विजयातून अशोक चव्हाण यांचं कुशल नेतृत्व दिसून येतं. चव्हाण यांच्या नेतृत्वामुळेच हे यश मिळू शकलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना आम्हाला पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे. जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आता अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत, असं खतगावकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या निकालानंतर शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी अत्यंत खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाजारू सणवार साजरे करणारे उमेदवार घेतले की असे फटाके फुटतात आणि स्वतःच फुसका बार होतो, असा टोला निलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. सरकारने खोटा प्रचार करून निवडून आणण्याचा डाव खोडून काढला. या विजयामुळे आमची दिवाळी तेजाने उजळली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगल काम केलं आहे, असंही त्या म्हणाल्या.
अशोक चव्हाण यांनीही या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपने खालची पातळी गाठून प्रचार केला होता. त्याला देगलूर बिलोलीच्या जनतेने साथ दिली नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. हा विजय लोकांचा विजय आहे. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईला लोकांची नेहमीच साथ मिळालेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला पूर्वीपेक्षा या वेळेला जास्त मतदान मिळालं. राजस्थानमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय आहे, असं चव्हाण म्हणाले.
जितेश अंतापूरकर यांच्या विजयाने आघाडीची ताकद वाढल्याचंही दिसून येत आहे. जितेश अंतापूरकर यांना 1 लाख 8 हजार 789 मते मिळाली. तर भाजप उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्तम इंगोले यांनी 11 हजार 347 मते घेतली. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे. यावरून महाविकास आघाडीची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे.
VIDEO l SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 2 November 2021https://t.co/GUhMUwZ9M4#SuperFastNews #GaonSuperfast #Superfast50Gaon50Batmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2021
संबंधित बातम्या:
मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी, लोकसभेला डेलकरांचा विजय, भाजपचा दारुण पराभव
वेतनवाढीचा प्रश्न दिवाळीनंतर सोडवणार, कामावर या; अनिल परबांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
(Bhaskarrao Patil Khatgaonkar big reaction after degloor-biloli assembly bye election)