गिरीश गायकवाड, मुंबई | दि. 4 मार्च 2024 : राज्यात गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. विदर्भ आणि खान्देशात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता नुकसानीची पंचनामे सुरु झाले आहेत. ४ मार्च रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा झंझावात सक्रिय असल्याने मुंबईसह किनारपट्टीवर थंड वारे वाहत आहेत.
मुंबईसह आणि किनारपट्टीवर दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहिल्यामुळे किमान तापमानात घट होऊन मुंबईत गारवा जाणवत आहे. उत्तरेकडून थंड वारे येत आहे. यामुळे मुंबईत सोमवारी पहाटेपासून थंडा वारे वाहू लागले आहे. उत्तर भारतात पश्चिम विक्षोप म्हणजे उत्तरेकडून येणारा थंड हवेचा झंझावात सक्रिय आहे. हा थंड हवेचा प्रवाह अरबी समुद्रावरून वाटचाल करत मुंबईसह किनारपट्टीवर पोहोचला आहे. थंड वाऱ्याने आपल्या सोबत अरबी समुद्रातील बाष्प वाहून आणले आहे. त्यामुळे किनारपट्टीवर थंड वारे वाहत असून, हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले आहे.
बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आकाश अंशतः ढगाळ राहिले. त्यामुळे मुंबईतील तापमानात घट झाली आहे. कुलाब्यात २३.३ आणि सातांक्रुजमध्ये २४.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्याच्या किमान तापमानात घट झाली आहे. पुढील दोन दिवस मुंबई, पुणे शहरात गारवा जाणवण्याचा अंदाज आहे.
राज्यात सोमवारी पुन्हा पावसाचा अलर्ट दिला आहे. अकोल, अमरावती, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. तसेच मुंबई किनारपट्टी आज सोमवारी तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाजही आहे.
जळगावातील पारोळा तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतपीकाचे तसेच फळबागांच्या नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली. या दौऱ्यात मंत्री अनिल पाटील यांनी पारोळा तालुक्यातील हिवरखेडे, मोंढाळे, करंजी, पिंपळभैरव, बहादरपुर, शिरसोदे, शेवगे बु., महाळपुर, कंकराज, भिलाली, कोळपिंप्री, रत्नापिंप्री, शेळावे खु., शेळावे बु. या गावांना भेट दिली, त्या शिवाय अमळनेर तालुक्यातील कन्हेरे, ढेकु, हेडावे येथील शेतात फळबागेत जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांचे सांत्वन केले तसेच शेतकऱ्यांना धीर दिला. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई खात्यात जमा करण्याची ग्वाही देखील यावेळी दिली.