मुंबईः राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असतानाच आता महत्वाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्याही बदल्यांना वेग आला आहे. त्यामुळे आज एका दिवसात तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या (Officer Transfer) झाल्याने या बदल्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आज दिवसभरातील ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यापैकी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे नाशिकच्या महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांची उचलबांगडी झाल्याने आयुक्त रमेश पवार (Commissioner Ramesh Pawar) यांची माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटस्थ म्हणून रमेश पवार यांचे नाव आहे, त्यांच्या जागी आता डॉ. चंद्रकांत पुलकुंडेवार (Dr. Chandrakant Pulkundewar) येणार असून ते लवकरत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारतील असं सांगण्यात आले आहे.
रमेश पवार यांची अवघ्या अवघ्या 1 महिना 7 दिवसात बदली झाल्याने या गोष्टीची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. रमेश पवार यांची तडकाफडकी बदली केली गेल्याने अधिकारी वर्गात जोरदार खळबळ माजली आहे.
डॉ. अभिजित चौधरी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना आणि महाविकास आघाडीच्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिजित चौधरी यांची बदली औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली होती, त्यावेळी सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित चौधरी यांच्या बदलीला दुरध्वनीद्वारे स्थगिती दिली होती, तर आता मात्र डॉ. मंताडा राजा दयानिधी यांची सांगलीच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तर जी. एम. बोडके यांची पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे, याआधी त्या ठिकाणी माणिक गुरसळ हे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. या तीन अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे चर्चेला मोठे उधाण आले आहे. तर राज्यातील आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.