यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत झाली. अनेक संस्थांच्या पोलमध्ये अटीतटीची दिसणारी ही लढत निकालाच्या दिवशी मात्र एकतर्फी झाली. विधानसभेच्या या निवडणुतीत सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला समोरं जावं लागलं. यंदाच्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला. याचेच पडसाद आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्यात आलं.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात निवडणुकीच्या निकालानंतर मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पोलिसांकडून विरोध झाल्यानंतर हे मॉक पोलिंग मागे घेण्यात आलं. यानंतर सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. शरद पवार मारकडवाडीला जाणार आहेत. राहुल गांधी देखील या गावात येणार असल्याची माहिती आहे. आज विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याबद्दल भूमिका मांडण्यात आली. एखादं सरकार एवढ्या मतांनी निवडून येतं. जल्लोष पाहायला मिळतो. पण राज्यात दिसत नाही. मग प्रश्न हाच पडतो की हे जनतेने दिलेलं बहुमत आहे की ईव्हीएम- निवडणूक आयोगाने दिलेलं बहुमत आहे. तेव्हा मारकडवाडीतील लोकांनी मॉक पोल मागितला. तो होऊ दिला नाही. त्यामुळे जनतेचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही. उद्या आम्ही शपथ घेणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मारकडवाडीत काही लोकांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. आम्ही जिंकलो आसेल तरी आज शपथ घेणार नाही. या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसत नाही. मारकडवाडीने बॅलेट पेपर वर निवडणुकी घेण्याचा निर्णय घेतला. यात निवडणूक आयोगाचा काय संबध आहे? पोलिसांचा काय संबध आहे? गावाने एखादा निर्णय घेतला तर लोकाशाही पध्दतीने आलेले सरकार वरवंटा पसरवण्याचे काम करत आहे. तर हे सरकार लोकशाही पद्धतीने आले नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे.
वरिष्टांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत. राज्यातील जनतेचे मत आहे हे सरकार जनमताने आलेले नाही. हे सरकार मतं चोरून आले आहे. सरकारने भूमिका घेतली पाहिजे, मॉक पोलींग होऊ द्यायाला पाहिजे होतं. मारकडवाडीमधील लोकांचं मत, जनभावना समजून घेतली पाहिजे होती, असं नाना पटोले म्हणालेत.