भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
भाऊचा धक्का ते मांडवा या रो-रो सेवेमुळे किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही जल वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. Mumbai Mandwa ro ro service launched
मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा या मार्गावरील बहुप्रतीक्षित रो रो सेवेचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी रो रो सेवेचे लोकार्पण करण्यात आले. मुंबई-अलिबाग अंतर आता अवघ्या पाऊण तासात गाठता येईल. (Mumbai Mandwa ro ro service launched)
भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी सेवेसारखीच जलवाहतूक किनारपट्टीवरील अन्य ठिकाणी सुरु करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर दिली. भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो-रो सेवा सुरु करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली अशा सर्वांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले.
भाऊचा धक्का ते मांडवा या रो-रो सेवेमुळे किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही जल वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. ही सेवा महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल, अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
अशी असेल भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो-रो सेवा…@CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AUThackeray pic.twitter.com/j9OR3NSwEA
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 15, 2020
रो रो सेवेसाठी ग्रीसहून आणलेल्या जहाजाची चाचणी यशस्वी झाली आहे. एकावेळी एक हजार प्रवासी आणि 200 गाड्या वाहून नेण्याची क्षमता या जहाजाची आहे. साधारण वर्गाचे तिकीट 220 रुपये, एसीचे 330 रुपये, तर लक्झरी क्लासचे तिकीट 550 रुपये आहे. कारच्या आकारानुसार 1100 ते 1900 रुपये तिकीट असेल.
गेट वे ऑफ इंडिया ते मांडवादरम्यान वर्षाला सुमारे 15 लाख जण प्रवास करतात. मांडव्यापर्यंतचा प्रवासाचा कालावधी 45 मिनिटे ते एक तासाचा आहे. रो रो सेवेमुळे कार्बन उत्सर्जन आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली, सर्व सुखरुप
मुंबई पोर्ट ट्रस्टने 31 कोटी रुपये खर्च करुन ‘रो पॅक्स’ सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. रो पॅक्स प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने मांडव्यात पायाभूत सुविधा विकसित केल्या. या कामांवर 135 कोटी खर्च झाले आहेत. मांडवा येथील रो रो सेवेच्या ‘रो पॅक्स टर्मिनल’चे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
(Mumbai Mandwa ro ro service launched)