मुंबई | 04 ऑक्टोबर 2023 : नांदेडमध्ये एकाच दिवशी 24 रुग्णांचा मृत्यू झाला. पुरेशी औषधं उपलब्ध नसल्याने हे मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासह राज्यातील अनेक ठिकाणी अशीच अवस्था पाहायला मिळतेय. नागपुरात 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते?, असा सवाल जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस- पवार सरकारला केला आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयात सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. आधी नांदेड, नंतर छत्रपती संभाजी महाराज नगर… आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात गेल्या दोन दिवसात २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
या सरकारच्या काळात आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर पोहोचली आहे. प्रशासनातील गैरव्यवहार, औषधांचा अपुरा साठा, डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अशा अनेक बाजू पुढे आल्या आहेत. त्यावर गांभीर्याने काम करण्याची सरकारला गरज आहे. अधिष्ठात्यांना शौचालय धुवायला लावणे ही बालिश कृती करून गोष्टी सुरळीत होणार नाहीत. कारण इथे प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे.
दुर्दैवाने निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान असे ब्रिद वाक्य वापरणारे, या गंभीर परिस्थितीत ढिम्म बसले आहेत. सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी आहे. राज्यात ही परिस्थिती असताना सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते हा खरा सवाल आहे?
पुण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. राज्याच्या आरोग्य खात्याच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात सरकार विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केलं. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालय परिसरात हे आंदोलन झालं. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात सरकारच्या अनास्थेमुळे लोकांचे जीव गेले, असा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला. या घटनेची जबाबदारी घेत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.