मुंबई : गेल्या चार वर्षांपासून सरकारमध्ये राहून सरकारविरोधात बोलून सत्तेची चव चाखणाऱ्या आणि स्वबळाचा नारा देत राज्यात ठिकठिकाणी जनतेची सहानुभूती मिळवणाऱ्या शिवसेनेने अखेर विरोधाच्या तलवारी म्यान करत भाजपसोबत युती केली. त्यानंतर राजकीय वर्तुळासह सगळीकडेच शिवसेनेची टिंगल सुरु झाली. सोशल मीडियावर तर ‘सामना’चा संपादकीय लेख काय असेल, यावर चर्चा सुरु झाली होती. अखेर आज ‘सामना’ प्रसिद्ध झाला आणि अर्थात त्यात संपदकीय अग्रलेख सुद्धा प्रसिद्ध झाला. मात्र, ज्या लोकांना वाटत होते की, ‘सामना’च्या अग्रलेखात युतीवर भाष्य असेल, त्यांची मात्र निराशा झाली आहे. कारण ‘सामना’चा आजचा अग्रलेख पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे.
‘त्यांना सुबुद्धी देवो!’ या मथळ्याखाली ‘सामना’चा आजचा अग्रलेख आहे. पुलवामा हल्ल्याचा राजकीय वापर करणाऱ्यांवर या अग्रलेखातून निशाणा साधला आहे.
युती झाली, लोकसभेसाठी शिवसेना 23, भाजप 25, विधानसभा 50-50
पुलवामा हल्ल्यावर अग्रलेख हा नक्कीच संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर केलेले भाष्य आहे. मात्र, अनेकांना अपेक्षित होते की, ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात युतीवर भाष्य असेल. मात्र, तसे झाले नाही. युतीचा विषय ‘सामना’ने आज तरी टाळला असून, पुलवामा हल्ल्यावर आधारित अग्रलेख प्रसिद्ध केला आहे.
‘सामना’तून भाजपवर टीका
युतीवर अग्रलेखात भाष्य नसले, तरी ओढून-ताणून अग्रलेखातून भाजपवर टीका करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसून येतो. “नवज्योतसिंग सिद्धू हा एक बेलगाम बोलणारा माणूस आहे, पण हे मूळ ‘प्रॉडक्ट’ भारतीय जनता पक्षाचेच आहे. पुलवामातील हल्ल्याने देशात संतापाचा भडका उडाला असताना या महाशयाने वक्तव्य केले की, ‘काही झाले तरी पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवली पाहिजे.’ या वक्तव्यामुळे नवज्योतसिंग सिद्धूची ‘सोनी’ टी.व्ही.च्या एका कार्यक्रमातून हकालपट्टी झाली व तसा दबाव व मोहिमा चालवल्या गेल्या, पण त्याच वेळी उत्तरेतील एक भाजप नेते नेपाल सिंग यांनी शहीद सैनिकांचा अपमान केला. ‘सैनिक मरत असतील तर मरू द्या, त्यांना त्याचाच तर पगार मिळतो ना?’ ही असली फालतू वक्तव्ये करणारा नेपाल सिंग मात्र आजही भारतीय जनता पक्षात आहे व त्याच्यावर कारवाई झालेली नाही.” असे म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.