विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. महापालिकेच्या आगामी निवडणुकीआधी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पाहिका निवडणुकीत जिथं- जिथं शक्य असेल, तिथं- तिथं राज ठाकरेंना सोबत घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटलं. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी काय करायचं हे फडणवीसच ठरवत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांना खेळवलं जात आहे. राज ठाकरे हे भाजपच्या हातातलं खेळणं झालं आहे हे आता स्पष्टपणे दिसत आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यातून तर हे आता स्पष्ट झालेलं आहे. राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष जसं सांगेल तशी भूमिका घेत आहेत. लोकसभेत, विधानसभेच्या निवडणुकीत आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी काय करायचं हे देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदा देखील झाला. विधानसभेमध्ये आमच्या हे लक्षात आलं त्यांच्यासमोर प्रश्न आहे की, त्यांचा महाराष्ट्रात पक्ष आहे. पण त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत. तर त्यांचा पक्ष चालेल कसा? आणि आमच्याकडे त्यांना देण्या करिता जागा नव्हत्या. आम्ही तीन पक्ष एकत्र लढत होतो. ही वस्तूस्थिती समजून विधात लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात सारखे आहेत. त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे. आम्हाला आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला जिथं शक्य आहे. तिथे त्यांना सोबत घेण्याच आम्ही प्रयत्न करू, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत दिलेत.