कार्यकर्त्यांनो हे तुम्हाला जमलं पाहिजे, मस्करीत का असेना शिंदे गटाच्या आमदाराने, ठाकरे गटाचे 2 आमदार फोडले
आपल्या पक्षाचे नेते ज्यांच्यावर टीका करतात त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांचा देखील छत्तीसचा आकडा असतो. पण पडद्यावरती एकमेकांवर सडकून टीका करणारे नेते जेव्हा प्रत्यक्षात समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्या भोवताल किती खेळीमेळीचं वातावरण असतं हे दाखवणारा प्रसंग आज समोर आहे.
मुंबई | 26 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या वर्षभरात घडलेल्या घडामोडी या सर्वसामान्य जनतेला अनपेक्षित अशा होत्या. विशेष म्हणजे शिवसेना पक्षात गेल्यावर्षी मोठी फूट पडली होती. त्यानंतर यावर्षी राष्ट्रावीद काँग्रेस पक्षात फूट पडली. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा तणाव बघायला मिळाला होता. अनेक ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. पक्षाचा हा वाद गाव-खेड्यांपासून अगदी घराघरांपर्यंत पोहोचला आहे. पक्षात झालेल्या फुटीनंतर पक्षाचे दोन्ही गटाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक बघायला मिळाले होते. पण या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारा प्रकार आज विधानसभेत बघायला मिळाला आहे.
कार्यकर्ते आपले नेते आणि पक्षासाठी काहीही करु शकतात. हे कार्यकर्ते वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी होतात. पक्षाच्या नेत्यासाठी हवं ते काम करतील. आपल्या पक्षाचे नेते ज्यांच्यावर टीका करतात त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांचा देखील छत्तीसचा आकडा असतो. पण पडद्यावरती एकमेकांवर सडकून टीका करणारे नेते जेव्हा प्रत्यक्षात समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्या भोवताल किती खेळीमेळीचं वातावरण असतं हे दाखवणारा प्रसंग आज समोर आला आहे.
राजकारणात एकमेकांच्या विरोधात असणारे नेते, एकमेकांवर टीका-टीप्पणी करणारे नेते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात विरोधकांसोबत मैत्रीचं नातं जपत असतात. याच मैत्रीतून पुढे भविष्यात नवी राजकीय समीकरणं निर्माण होतात. विशेष म्हणजे राजकारणात मित्र असणारे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधकदेखील बनतात. या सगळ्या घडामोडींदरम्यान कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अगदी तुटून पडायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत. अशा कार्यकर्त्यांसाठी आज शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांची झालेली भेटीची नक्कीच माहिती मिळवावी.
संजय शिरसाट यांच्या एका वक्तव्याने हशा पिकला
विधी मंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे सर्व आमदार सध्या मुंबईत आहेत. या दरम्यान विधी मंडळाच्या आवारात आज ठाकरे गटाचे नेते नितीन देशमुख, कैलास पाटील आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांची आज अचानक भेट झाली. यावेळी ठाकरे गटाच्या दोन आमदारांना घेऊन आलो, असं संजय शिरसाट मिश्किलपणे म्हणाले. यावेळी परिसरामध्ये एकच हशा पिकला.
जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यातही गप्पा रंगल्या
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची विधान भवनच्या कॉरिडोअरमध्ये अचानक भेट झाली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये देखील चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. अतिशय खेळीमेळीने दोघांचं संभाषण सुरु होतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.