रमेश शर्मा, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटानंही दावा केलाय. यासंदर्भात शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले, जर आणि तर वर आम्ही काही बोलू इच्छित नाही. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. तुम्ही भाजपचे कंत्राटदार आहात, असा संताप त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप आता शिंदे गटाकडून केला जात आहे. अरविंद सावंत म्हणाले, याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. मुळात त्या पक्षचिन्हाचा गैरवापर शिंदे गट करतोय.
घर कुणी सोडलं आम्ही की तुम्ही? कोण सुरतला गेलं, कोण गुवाहाटीला गेलं? कोण गोव्याला गेलं. कशासाठी गेलं? आमचं चिन्हही वापरताय. वंदनीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतीमा वापरतात. आनंद दिघेंची प्रतीमा वापरताहेत.
राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर काही काळ ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेचा वापर करत होते. बाळासाहेबांनी आदेश दिला की, माझ्या फोटोचा वापर करायचा नाही. गैरवापर कोण करतो. ते की आम्ही. पडद्यामागचे सूत्रधार भाजपची लोकं आहेत, अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.
त्यांनी पत्र दिलं म्हणून काय झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहीलं. संविधानानं आयोगाकडं अधिकार दिलेत. त्याला नियमावली आहे.
उद्या मी देतो पत्र. भाजपचे सर्व माझ्यासोबत आहेत. चिन्ह मला द्या.व्हेरिफिकेशन करतील की, नाही. लक्षावधी सदस्य शिवसेनेचे आहेत. शिवसेना पक्षप्रमुख ते शेवटचा शिवसैनिक असं ते जाळं आहे.
पदाधिकारी, जनप्रतिनिधी आहेत. आमदार, खासदार म्हणजे जनप्रतिनिधी आहेत. तेही शंभर टक्के तुमच्यासोबत आहेत का, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.
विधान परिषद सदस्य आहेत. इतर पदाधिकारी आहेत. मुळातच बेकायदेशीर सरकार आहे. अनैतिक, असंविधानिक सरकार आहे. त्याला काय अर्थ आहे.
आभाळ कोसळल्यासारखं जे दांडे घेऊन फिरता ते बंद करा. काही आभाळ कोसळलं आहे का? शिंदे गटानं निवडणूक आयोगाला पत्र दिलं. ते आम्हाला विचारेल. तेव्हा देऊ उत्तर. नियमानं होणार, असंही ते म्हणाले.